रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि थोर विचारवंत-लेखक श्री.रंगा हरि (जन्म ५ डिसेंबर १९३०) यांचे दि. २९ ऑक्टोबरला कोची येथे दु:खद निधन झाले. हरिजींचे पूर्वज १५४० च्या सुमारास पोर्तुगीजांच्या अत्याचारांना कंटाळून आपल्या कालवे (मडगाव, गोवा) या मूळ गावातून केरळच्या एर्नाकुलमजवळील चेरानेल्लूर या गावी स्थलांतरित झाले. हरिजींच्या वडिलांचे नाव तेरुविपरंबिल जनार्दन शेणॉय तर आईचे नाव पद्मावती. त्यांना तीन भाऊ आणि चार बहिणी होत्या. सन १९४४ मध्ये त्यांचा रा.स्व.संघात प्रवेश झाला. त्यांचे शालेय शिक्षण सेंट अल्बर्ट हायस्कूलमध्ये आणि इंटरपर्यंतचे शिक्षण महाराजा कॉलेज, कोची येथून झाले. त्यांनी १९४८ साली बी.एस.एसी. (रसायनशास्त्र) ला प्रवेश घेतला. परंतु त्याच वेळी संघावर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहात त्यांनी उडी घेतल्यामुळे त्यांना हा अभ्यासक्रम अर्धवट सोडून द्यावा लागला. कन्नूरच्या कारागृहात डिसेंबर १९४८ ते एप्रिल १९४९ असे पाच महिने ते अटकेत होते. कारावासातून सुटल्यावर त्यांनी अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास आणि राजकारणशास्त्र या विषयांत बी.ए. पूर्ण केले. हरिजींनी १९४७, १९५० आणि १९५२ साली संघ शिक्षा वर्गांचे प्रशिक्षण घेतले. दि.३ मे १९५१ ला ते संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. परूर नगर प्रचारक (१९५१-१९५५), त्रिशूर जिल्हा प्रचारक (१९५५-१९६२), दक्षिण केरळ विभाग प्रचारक (१९६२-१९७८), केरळ प्रांत बौद्धिक प्रमुख (१९७८-१९८२), केरळ सह प्रांत प्रचारक (१९८२-१९८३), केरळ प्रांत प्रचारक (१९८३-१९९४), अ.भा. सहबौद्धिक प्रमुख (१९९१), अ.भा.बौद्धिक प्रमुख (१९९१-२००५), अ.भा.कार्यकारिणी सदस्य (२००५-२००७) अशा संघातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. संस्कृत, मल्याळम, मराठी, कोकणी, हिंदी, तामिळ आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. संघकामानिमित्त त्यांनी पाच खंडांतील २२ देशांचा प्रवास केला. रा.स्व.संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात (२००६) त्यांनी अमेरिकेच्या विविध राज्यांत श्रीगुरुजींवर २८ दिवसांत २२ भाषणे दिली. सन १९४८ मध्ये हरिजींनी आपल्या लेखनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांचे 'पृथ्वी सूक्त' हे अखेरचे पुस्तक काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. रामायण, महाभारत, भगवदगीता, विष्णुसहस्रनाम, धर्म, संस्कृती इ. विषयांवर त्यांनी मल्याळम, हिंदी, कोकणी आणि इंग्रजीत विपुल ग्रंथलेखन आणि अनुवाद लेखन केले. पोर्तुगीज शासित गोव्यातून हिंदुंच्या स्थलांतरावर त्यांचे 'विस्थापनाची कथा' हे कोकणी खंडकाव्य २०१४ साली प्रसिद्ध झाले. श्रीगुरुजी समग्र (१२ खंड, हिंदी, २००५), प्रचारक पाथेय (श्रीगुरुजींच्या पत्रांवरून, हिंदी, २००५), दृष्टी और दर्शन (श्रीगुरुजी समग्रचे संक्षिप्त रूप, हिंदी, २००६), श्री गोळवलकर हिज व्हिजन अँड मिशन (इंग्रजी, २००७), श्रीगुरुजी जीवन चरित्र (हिंदी, २०१०) ही त्यांची श्री गोळवलकर गुरुजींसंबंधी पुस्तके ऐतिहासिक महत्त्वाची आहेत.
मा. रंगा हरिजी 'सांस्कृतिक वार्तापत्र'चे साक्षेपी वाचक होते. रा.स्व.संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांवरील 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' हा ग्रंथ वाचल्यावर त्यांनी अभिनंदनाचे विशेष पत्र 'सांस्कृतिक वार्तापत्र' ला पाठविले होते. 'भव्योदात्त' 'आपल्या कामाच्या दृष्टीने उत्तम संदर्भ ग्रंथ' असे या ग्रंथाचे वर्णन करून त्यांनी एका आठवड्यात त्यातील डॉ.हेडगेवारांच्या जीवनपटाचे मल्याळममध्ये अनुवाद करून त्याचा प्रसार तालुका स्तरावरील संघकार्यकर्त्यांपर्यंत घडवून आणला. 'द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस' या 'सांस्कृतिक वार्तापत्र' निर्मित दुसऱ्या ग्रंथाला त्यांनी लेख आणि काही दुर्मीळ छायाचित्रे दिली होती. इतकी विद्वत्ता आणि कर्तृत्वाचे धनी असलेले हरिजी स्वभावाने अत्यंत साधे आणि ऋजू होते. त्यांच्या अकृत्रिम स्नेहाचा अनुभव आणि सहवास असंख्य लोकांसाठी प्रेरणा आणि आनंद देणारा होता. ते शरीररूपाने आपल्यात नसले तरी विचाररुपाने सदैव आपल्यात असतील. मा. रंगा हरिजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. श्रीरंग गोडबोले
अध्यक्ष, संस्कृती जागरण मंडळ