मालवणपासून ३३ किलोमीटर आणि आजऱ्यापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरासमोर चिर्याने बांधलेलं तळं आहे. मंदिराच्या परिसरात वीरगळ, पिंडी, दगडी स्तंभदेखील आहेत. तळ्यामध्ये भिंत बांधून दोन भाग केले आहेत. या दोन्ही तळ्यातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्रे ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या तळ्यात पाण्याचे झरे आहेत. या तळ्यातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून डाव्या बाजूच्या तळ्यात जाते आणि पुढे पाटामार्गे शेतीजमिनीत जाते. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. ‘बोंबडेश्वर’ अशी साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते. मालवणी भाषेत बोंबडे म्हणजे बुडबुडे!
तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. भूस्तराखाली जे अनेक दगड असतात त्यात सच्छिद्र दगडही असतात. या सच्छिद्र दगडात असलेल्या पोकळीत हवा असते. कोकणात होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बेसॉल्ट खडकातील क्षार वाहून जातात त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे . क्षार वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छिद्र बनलेला असतो. या सच्छिद्र दगडातून वहात येणार्या पाण्याबरोबर हवा दगडातील पोकळ्यांमध्ये अडकून राहाते. मोठ्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे सच्छिद्र दगडातील पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुड्यांच्या स्वरुपात पाहायला मिळते.
Ref - https://samantfort.blogspot.com
/2018/05/blog-pos