खरबूज शेतीतून साधला विकास

SV    28-Dec-2023
Total Views |
 
 नांदेड जिल्ह्यातील बारड येथील नवनाथ देशमुख यांनी दहा वर्षांपासून खरबूजाच्या शेतीत सातत्य ठेवले आहे. दर्जेदार उत्पादनात त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. नांदेड येथील बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच थेट विक्रीचे तंत्रही आत्मसात करीत त्यांनी या पिकातील नफा वाढवला आहे.
नवनाथ आणि त्यांचे बंधू शिवाजी यांची शिवारात साडेपाच एकर संयुक्त जमीन आहे. वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय आहे. बारड शिवाराला इसापूर प्रकल्पाचे पाणी मिळते. त्यामुळे हा भाग कायम बागायती पिकांचा भाग राहिला आहे. केळी, ऊस, हळद ही या भागांतील मुख्य पिके आहेत. अनेक शेतकरी हंगामी फळपिकांची लागवड करतात. यात पपई, टरबूज, खरबूज यांचा समावेश आहे.
सुमारे बारा वर्षांपूर्वी गावातील काही मोजके शेतकरी खरबुजाची लागवड करीत होते. नवनाथ यांनी त्यांच्याकडून ही शेती व त्याचे अर्थकारण जाणून घेतले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या पिकाकडे वळण्याचा विचार केला. साधारण दहा वर्षांपूर्वी सव्वा एकरामध्ये लागवड केली. आज दहा वर्षांच्या सातत्यातून हे पीक चार ते सव्वाचार एकरांपर्यंत वाढविले आहे.
दरवर्षी १५ ते २० ऑक्टोबरच्या काळात  रोपवाटिका तयार केली जाते. दहा नोव्हेंबरच्या काळात पुनर्लागवड केली जाते. ऑक्टोबर ते एप्रिल या काळात प्रति महिना ते पंचवीस दिवसांच्या कालावधीने तीन ते चार टप्यांत लागवड केली जाते.
खरबुजाच्या काढणीनंतर खरीपात सोयाबीन असते व त्याच्या काढणीनंतर पुन्हा खरबूज हीच पद्धती दरवर्षी अवलंबिली जाते. खरबुजाची प्रत चांगली मिळावी यासाठी काही सेंद्रिय घटकांचा वापर केला जातो. यात नवनाथ यांनी स्वतः एक घटक तयार केला असून, त्यास अमृत गोडवा असे नाव दिले आहे.
योग्य नियोजनातून दरवर्षी एकरी १४, १५ ते १८ टनांपर्यंत खरबुजाचे उत्पादन मिळते.
खर्च वजा जाता सुमारे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे पीक सुमारे ९० दिवसांत मिळवून देते असे नवनाथ सांगतात. मुख्य रस्त्याकडेला स्टॉल उभारूनही खरबुजाची थेट विक्री काही प्रमाणात ते   करतात. थेट विक्रीचा फायदा विक्री व्यवस्थापनासाठी  होतो.  कृषी  विभागाकडून देशमुख यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
अॅग्रोवन ५.१०.२३