कमांडोना घडविणारी 'वंडर वुमन’

SV    29-Dec-2023
Total Views |
 
 या आहेत संरक्षण दलातील जवानांना लढाऊ प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यातून देशासाठी कमांडो घडविणे हा आणि हाच एकमेव उद्देश कुठल्याही आर्थिक मोबदल्याशिवाय वीस वर्षाहून अधिक काळ तिन्ही संरक्षण दलांसह राज्य पोलीस, केंद्रीय पोलीस, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, गरूड यांच्यासारख्या स्पेशल फोर्सेसमधील जवानांना प्रशिक्षण देणाऱ्या, डॉ. सीमा राव डॉक्टर असूनही आपल्यातील सैनिकाला आणि कमांडो प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन आपल्यातील कौशल्याला न्याय देणाऱ्या, महिलांना केवळ सशक्तच नव्हे तर त्यांच्यातील लढाऊ बाणा जागृत करण्याचे काम पती मेजर दीपक राव यांच्यासह अविरत करणाऱ्या डॉ. सीमा राव यांना देशाच्या 'वंडर वूमन' म्हणून ओळखले जाते.
स्वातंत्र्यसैनिक रमाकांत सिनारी यांची सीमा  ही कन्या. वडिलांपासून त्यांनी प्रेरणा घेतली. देशासाठी काहीतरी त्यांना करायचे होते. काश्मीर खोरे, तेथील गोठविणारे वातावरण, जंगलामध्ये त्यांनी त्यांच्या तारुण्यातील काही काळ व्यतीत केला. लग्नानंतर पतीच्या मिळालेल्या साथीने त्यांचे ध्येय अधिक दृढ झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यातील लढाऊ बाण्याचे कौतुक केल्यानंतर दोघांना प्रशिक्षणासाठी बोलावले गेले आणि मग घडला तो इतिहास ! डॉ.सीमा राव या देशातील पहिल्या महिला आणि एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत.
आजवर वीस हजारांहून अधिक कमांडोना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. तिन्ही संरक्षण दलांसह निमलष्करी दल,सीमा सुरक्षा दल,गृह मंत्रालयात येणारे एनएसजी,हवाई दलाचे गरुड यांच्यासारखे स्पेशल फोर्सेसमधील जवानांनाही कमांडो प्रशिक्षण त्यांनी दिले आहे.
डॉ.सीमा राव या 'क्लोज क्वार्टर कॉम्बॅट' मध्ये तज्ज्ञ आहेत. याशिवाय त्या शुटींग इन्स्ट्रक्टर तसेच स्कुबा डायव्हर आहेत. त्या रॉक क्लायम्बिंग 'एचएआय'चे पदक विजेत्या आहेत. त्यांना आजवर अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले आहे.  आगीच्या घटनांत लढण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. डॉ.सीमा यांनी विनयभंग,लैंगिक हल्ला, छळ यांच्याविरोधात महिलांना तोंड देता यावे यासाठी 'डेअर' (डिफेन्स अगेन्स्ट रेप आणि इव्ह टीझिंग) नावाचा प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे.
डॉ.सीमा यांची मुलगी कोमल यांनीही वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईतील लढाऊ प्रशिक्षणासाठी असलेली अॅकॅडमी त्या सांभाळतात. जर्मनीमध्ये झालेल्या मिक्स्ड मार्शल आर्ट केज फाईटमध्ये पुरुष सहकाऱ्यांचा कोमल यांनी पराभव केला आहे.
      लोकमत २३.१०.२३