मनाचे सौंदर्य

SV    30-Dec-2023
Total Views |
 
 आनंदवनाचा राजा सिंहराज मोठा रसिक होता. तो वनातील प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या गमतीच्या स्पर्धा घेत असे. एकदा त्याने सर्व पक्ष्यांसाठी एक स्पर्धा ठेवली. या स्पर्धेत जो पक्षी सर्वात सुंदर व अनमोल वस्तू आणेल त्याला 'पक्षीरत्न' हा पुरस्कार मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. स्पर्धा जिंकण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली. प्रत्येकाने डोके लढवून वेगवेगळी वस्तू आणली. चिमणीने मोत्याची माळ, मोराने सुंदर शंख, कोकिळेने गुलाबाची फुले, तर घारीने चांदीचे पैजण आणले, कावळ्याने मात्र आपले छोटे काळेकुट्ट पिलू आणले. ते पाहून सर्वजण हसू लागले. उपहासाचे बाण कावळ्यावर सुटू लागले. शेरेबाजी सुरु झाली. कावळा निमूटपणे सगळे ऐकत होता. ठरल्या वेळेला वनराजाने नेमलेले परीक्षक आले. त्यांनी नीट परीक्षण केले. थोड्याच वेळात परीक्षकांच्या वतीने राजाने निर्णय व त्यांचे मनोगत जाहीर केले, ''हिरे, चांदी, मोती, फूल या गोष्टी सुंदर असल्या तरी त्या खऱ्या सुंदर नाहीत. खरी सुंदरता म्हणजे मनाची सुंदरता. ती कावळ्याजवळ आहे. म्हणून तो आपल्या पिलालाच घेऊन आला. पक्षीरत्न पुरस्काराचा मानकरी म्हणून आम्हीं कावळ्याचे नाव जाहीर करीत आहोत. तो कुरूप आहे. मनाच्या सौदार्यांचे मोल अनमोल असते. इतर गोष्टींचे मोल आपण ठरवू शकतो.'' टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात वनातील सर्व  प्राण्यांनी व कावळ्याला पूर्वी नावे ठेवणाऱ्या पक्ष्यांनी परीक्षकांच्या घोषणेचे स्वागत केले. कावळ्याची सौदर्यंदृष्टी त्यांना कळली तेव्हा तिचे मर्म त्यांच्या लक्षात आले.
तात्पर्य : सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य डामडौल नाही. सौंदर्य म्हणजे नुसत्या मौल्यवान वस्तूही नाहीत. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असते. प्रत्येक आईच्या दृष्टीने आपले मूल हे सुंदरतेचा सर्वोकृष्ट अविष्कार असते. उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे सौंदर्य.
   अनमोल बोधकथा