ई कचरा व्यवस्थापन

SV    12-Jan-2024
Total Views |
 
 इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल वस्तूंचा वापर मागील १०-१५ वर्षात मोठ्या प्रमाणात भारत देशात वाढला आहे आणि सतत वाढत चालला आहे. पण त्याबरोबर अनेक त्या संदर्भातील समस्यासुद्धा वाढत चालल्या असून त्यांचा गांभीर्याने  विचार व्हायला पाहिजे. ई-कचऱ्यामुळे काय परिणाम होतात किंवा कोणत्या समस्या निर्माण होतात याचा विचार तुम्ही कधी केला का? हा विचार करण्याची वेळ आली आहे का? मी त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेन की ई कचरा म्हणजे काय हे कितपत नागरिकांना कळले आहे, या सर्व विषयांसंदर्भात चर्चा व्हावी.
सध्या भारतात २० लाख टन ई-कचरा तयार होत आहे व त्यापैकी फक्त पाच लाख टन कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. म्हणजेच भारतात २०% ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा आहे किंवा २०% ई-कचरा  यंत्रणेकडे दिला जातो. पण प्रश्न आहे की ८०% ई-कचऱ्याचे काय होते व याची योग्य विल्हेवाट कशी लावली जाऊ शकते यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील. शहरांमध्ये ९०% ई-कचरा तयार होत असल्याने त्याची समस्या शहरात दिसून येत आहे. पण ग्रामीण भागातील वाढत असलेले प्रमाण भविष्यात चिंता वाढवणारे आहे
‘पूर्णम’ संस्था गेली अकरा वर्षे कचरा व्यवस्थापनात काम करत आहे आणि ई-कचरा व्यवस्थापन हा प्रकल्प राबवत आहे. ई-कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे वाढत असलेले काम व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पुणे शहरापासून ई-कचरा प्रकल्पाचे सुरु झालेले काम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात पोहोचले आहे. ‘पूर्णम’ संस्थेच्या ई-कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून मुख्य दोन भागावर लक्ष दिले जाते. त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांची जनजागृती करणे हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे ई-कचरा संकलन करून रिसायकलिंग करण्यासठी देणे. ई-कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर काम केले जाते. यामध्ये सोसायटी, शाळा, महाविद्यालय, कॉर्पोरेट कंपनी व सार्वजनिक ठिकाणी ई-कचरा जनजागृती व संकलन मोहिमेचे आयोजन केले जाते. ई- कचरा संकलन करण्यासाठी समाजोपयोगी यंत्रणा उभी केली जाते. ई-कचरा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘पूर्णम’ संस्थेद्वारे २६ जानेवारी, फेब्रुवारीतील विज्ञान दिवस आणि १५ ऑगस्ट निमित्त ई कचरा जनजागृती व संकलन महा अभियान राबवण्यात येते.
प्रकल्पामध्ये जमा झालेला ई-कचरा सरकारमान्य रिसायकलिंग कंपनीला सुपूर्त केला जातो व त्याच्या आधारे शास्त्रीय पद्धतीने विघटन केले जाते. ई-कचऱ्यामध्ये आलेले संगणक दुरुस्त करून ग्रामीण भागातील शाळा, संस्था किंवा अनाथ आश्रम येथे दिले जातात. आतापर्यंत ७५० पेक्षा जास्त संगणक दान करण्यात आले आहेत.
‘पूर्णम’च्या ई-कचरा या प्रकल्पामध्ये नागरिक म्हणून आपला सहभाग खूप महत्त्वाचा आहे.
सुभाष अंभोरे, प्रकल्प व्यवस्थापक
७७२००५४१७२