राणे बंधूंची भरीत वांगी सर्वदूर प्रसिद्ध

SV    16-Jan-2024
Total Views |
 
 जळगाव जिल्ह्यात भुसावळ या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे  १५ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव आहे. गावाला नदीचा मोठा स्रोत नाही. कमी पाऊस व दुष्काळी स्थितीचा शेतकऱ्यांना फटका बसतो. भाजीपाला उत्पादनात हे गाव आघाडीवर आहे. गावातील ज्ञानेश्वर व धनराज यांनीही भाजीपाला उत्पादनात  नाव मिळवले आहे.
शेती ४० एकर असून दोघा बंधूंनी व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. तीन विहीरी, तीन कूपनलिका आहेत. परंतु सात ते आठच महिने पाणी त्यात असते. उन्हाळ्यात जलसंकट तयार होते. यामुळे पावसाळ्यातील तसेच उन्हाळा सुरु होण्यापूर्वीची पिके घेण्यावर भर असतो.
भरीत वांग्यांचं जतन केलेलं पीक : भरताचे वांगे हे राणे यांचे मुख्य पीक आहे. सुमारे ३५ वर्षांहून अधिक किंवा आजोबांच्या काळापासून त्यांनी अनेक संकटामधून हे पीक मोठ्या कष्टाने जोपासले आहे. दरवर्षी मे अखेर ते जूनचा पहिला आठवडा, जून व जुलै अशी तीन टप्प्यांत त्याची लागवड होते. फेब्रुवारीत दर्जेदार पिवळी झालेली वांगी तोडून त्यातून बिया काढल्या जातात. त्या घरात पत्री डब्यात साठविल्या जातात. पुढे रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात. हे चक्र वर्षानुवर्षे सुरु आहे.
उत्पादन : लागवडीनंतर साधारण अडीच महिन्यांनी तोडणी सुरु होते. एकूण हंगामात सुमारे  १२ ते १३ तोडण्या होतात. त्यासाठी मजुरांची व्यवस्था, जुळवाजुळव करून ठेवावी लागते. शेतातच प्रतवारी होऊन प्लास्टिक पिशव्यांमधून पॅकिंग होते. वांगी हे शरीरास ऊब देणारे पिक असल्याने हिवाळ्यात मोठा उठाव असतो. या काळात उत्पादनही चांगले मिळते.
बाजारपेठ : दसरा, दिवाळी सणात खानदेशात, विशेषतः जळगाव जिल्ह्यात अनेक घरांत भरीत, भाकरी-पुरी असा मेन्यू असतो. या काळात वांग्यांना मोठी मागणी असते. त्या दृष्टीने ऑक्टोंबरच्या मध्यात बाजारात आवक सुरु होते. या काळात सुरुवातीच्या दरांचा लाभही मिळतो. दर्जा, गुणवत्ता व चव यामुळे या वांग्यांना जळगाव, भुसावळच्या बाजारासह आठवडी बाजारांत ग्राहकांकडून मोठी मागणी असते. राणे यांच्याकडील वांग्यांनाही याच बाजारपेठा आहेत. अनेक खरेदीदार शेतात येऊनही खरेदी करतात.
या पिकातून एकरी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे राणे सांगतात.

अॅग्रोवन २३.११.२३