'संस्कृत : आज आणि उद्या'

SV    02-Jan-2024
Total Views |
 
 भारतात व जगात सांस्कृतिक उत्थानाच्या अनेक घटना घडत असताना सांस्कृतिक वार्तापत्राकडून 'संस्कृत आज आणि उद्या' हे पुस्तक प्रकाशित होत आहे. कुठल्याही राष्ट्राच्या उत्थानाच्या प्रक्रियेमध्ये जसे, नवनवीन विचार, नवनवीन शोध, नवनवीन कार्यपद्धती महत्त्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे यशस्वी ठरलेल्या प्राचीन कार्यपद्धतीही आजच्या काळात उपयुक्त आहेत. याचे केवळ प्रतिपादन करून भागणार नाही तर त्याबाबत आजच्या आजच्या काळाला उपयुक्त अशी मांडणी  करणे गरजेचे ठरते. या पुस्तकास 'स्वामी गोविंददेव गिरी' यांची प्रस्तावना आहे.
भारतात गेली शेकडो वर्षे परकीय विचारांची, संस्कृतीची राजसत्ता असल्यामुळे सांस्कृतिक वैज्ञानिक, सामाजिक असा सर्वंकष विकास होऊ शकला नाही. त्याचबरोबर पारतंत्र्याच्या  पूर्वीच्या विकसित भारतातील विविध शाखांचे अध्ययन, विकसन आणि स्पष्टीकरण पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवते. त्यासाठी प्राचीन ग्रंथांचा, प्राचीन घटनांचा मुळातून अभ्यास होणे खूप गरजेचे असते. या दोन्हीची एकत्रित जोड मिळाली की प्राचीन ग्रंथांचे  योग्य स्पष्टीकरण, विवरण, आणि कालसुसंगत मार्गदर्शन मिळू लागते. यासाठी प्रथमतः प्राचीन भारत विकसित भारत होता हे गृहीतक धरून त्या दिशेने कामाला सुरुवात जसे आर्य भारतातील नव्हते हे गृहीतक मानल्यामुळे अनेक संशोधनांची दिशा गेली काही वर्षे बदललेली होती. पण जेव्हा आर्य म्हणजे कोणी आक्रमक नाहीत तर सुसंस्कृत लोक असा अर्थ आणि त्याचबरोबर आर्यांचे  मूळ सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यात होते हे स्पष्ट झाल्यावर अनेक पाश्चात्य विचारांचा पगडा असलेले काल्पनिक सिद्धांत फोल ठरले. आज जर पुन्हा प्राचीन भारतीय ग्रंथांचे अध्ययन नव्याने होणे गरजेचे असेल तर प्रथमतः आपले गृहीतक बदलले पाहिजे. त्याचबरोबर या प्रगत ग्रंथांची भाषा म्हणजे संस्कृत जाणून घेणे गरजेचे आहे. नव्याने संस्कृत शिकणाऱ्या लोकांनी किंवा संस्कृत शिकलेल्या लोकांनी स्वतंत्रपणे किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या लोकांबरोबर बसून अनेक वैज्ञानिक ग्रंथांचे अध्ययन करून त्यांचे कालसुसंगत प्रतिपादन करणे  गरजेचे आहे.
प्रस्तावनेत स्वामी गोविंददेव गिरींनी म्हटल्याप्रमाणे, दिव्य भूतकाळाप्रमाणे भविष्यकाळही उज्ज्वल घडायला हवा असेल, तर त्यासाठी वर्तमानात नियोजन बद्ध, पद्धतशीर कठोर परिश्रम  सातत्याने करावे लागतील. एखाद्या शिखर संस्थेद्वारे संस्कृत भाषेला परमवैभवाकडे नेण्याचे उद्दिष्ट ठेवून आणि त्यासाठी एक  बृहत आराखडा करून कामांचे विभाजन करून, कामांचे विभाजन करून सर्वांनी एकदिलाने काम केले तर हे घडू शकेल. हे केवळ  दिवास्वप्न नाही. इंग्रजी, हिब्रू भाषांच्या बाबतीत असे घडले आहे.'' एकशे छत्तीस पानांच्या या पुस्तकाचे मूल्य रु १५०/- मात्र आहे.
सांस्कृतिक वार्तापत्र
सी-१, शालिनी रेसिडेन्सी गेट नं-२,
ICICI बँकेची इमारत, हिंगणे बु. कर्वेनगर, पुणे ५२
दूर क्र. ८८०६३७४७५८ | ९६०४९९३७१५