शिंगवेतील तेवीस शेतकऱ्यांनी विणला रेशीम धागा

SV    14-Dec-2024
Total Views |
 
 पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढला आहे. शिंगवे (ता. आंबेगाव) येथील २३ शेतकऱ्यांनी चार वर्षांत ५०  एकरावर रेशीम शेती यशस्वीरीत्या फुलवली आहे. रेशीम कोषाला सरासरी प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
शिंगवे येथील दोन शेतकरी रेशीम शेतीचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहेत. इतर सात शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव पाहून चार वर्षांपूर्वी रेशीम शेतीमधील सर्व बारकाव्यांबाबत अभ्यास केला. रेशीम उद्योगातील संधी, बाजारपेठ जोखीम यावर चर्चा करून रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सात शेतकऱ्यांनी सात एकरावर रेशीम शेती करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने प्राथमिक स्वरूपात एक-एक एकरावर शेती करण्यास सुरुवात केली. त्यासाठी शेडची उभारणी, लोखंडी रॅक कटिंग साहित्य, शेतीसाठी लागणारा खर्च यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च केला, शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान देखील प्राप्त झाले आहे. ही रेशीम शेती यशस्वी झाल्यानंतर शिंगवे येथील २३ शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य देत आता ५० एकरांवर यशस्वी रेशीम शेती यशस्वी फुलवली जात आहे. २४ दिवसांच्या बॅचच्या रेशीम किड्यांचे व्यवस्थापन (मोल्डमध्ये)
पहिला मोल्ड -  अळ्या हॅचरीमधून बाहेर आल्यानंतर सहा दिवसांनी शेडवरील पाल्यावर पसरविल्या जातात.
दुसरा मोल्ड - सलग १२ दिवस सकाळ संध्याकाळ पाला टाकला जातो.
तिसरा मोल्ड - दुसऱ्या मोल्डच्या दीड दिवसांच्या  उपवासानंतर पुढील पाच दिवस सात वेळा पाल्याचे फीडिंग केले जाते.
चौथा मोल्ड - पुन्हा दोन दिवसांनी चौथा मोल्ड बसतो.
पाचवा मोल्ड चौथ्या मोल्डनंतर ७ दिवस १४ वेळा सकाळ-संध्याकाळ त्याचे फीडिंग केले जाते.
यानंतर प्रत्यक्ष कोष करण्यास प्रारंभ- पाच मोल्डनंतर अळ्या धागा सोडण्यास प्रारंभ करतात. याचवेळी लगेच बेडवर चंद्रिका (चौकोनी पिवळी प्लस्टिक जाळी) अंथरली जाते. या जाळ्यांवर अळ्या  कोष तयार करायला लागतात. पुढील तीन दिवसांत कोष तयार होतात. यानंतर कोष वाळल्यावर पाचव्या दिवशी काढले जातात.
शिंगवे गावात सुमारे २३ रेशीम शेड्स असून सुमारे ५० एकरावर तुतीची लागवड आहे. सर्व शेतकरी एकत्र रेशीम गोण्या भरून बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नेतात. त्यामुळे वाहन भाड्यात बचत होते. रेशीम कोषाला सर्वाधिक दर किलोमागे ६८५ रुपये तर कमीत कमी दर ४५० रुपये मिळाला आहे.
सकाळ १२.९.२४