काँग्रेस आणि दहशतवादाचे नाते जुनेच !

SV    19-Dec-2024
Total Views |
 
 नवी दिल्ली : राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरल्याचा आरोप होत असतानाच त्यांचा फुटीरतावादी नेत्यांविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर वेगळ्या पद्धतीने समोर आला. काश्मीरमधला फुटीरतावादी नेता यासीन मलिक याची तुरुंगातून सुटका करा, अशी मागणी करणारे पत्र मलिकची पाकिस्तानी पत्नी मुशाल हुसेन मलिक हिने राहुल गांधींना पाठवले आहे.
यासीन मलिक हा टेरर फंडिंग आणि दहशतवादी कृत्यांना चिथावणी या आरोपांखाली तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर फुटीरतावादी नेत्यांचा हुरूप वाढला आहे. या हुरूपामधूनच यासीन मलिकच्या पत्नीची थेट राहुल गांधींना पत्र लिहायची हिंमत झाली आहे.
“यासीन मलिक तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी जम्मू – काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी त्याची नक्की मदत होऊ शकते. सबब तुम्ही संसदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने यासीन मलिकच्या सुटकेचा मुद्दा लावून धरा”, अशी मागणी मलिकची पत्नी मुशाल हुसेन मलिक हिने राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
या पत्रामुळे काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण यासीन मलिक आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीचे फोटो काँग्रेससाठी अडचणीचे ठरले होते. आता त्या पुढे जाऊन थेट फुटीरतावादी नेत्याच्या पत्नीनेच राहुल गांधींना पत्र लिहून त्याची सुटका करायची मागणी केल्याने काँग्रेस + राहुल गांधी आणि फुटीरतावादी नेते यांचे कनेक्शन उघड झाले आहे.
कोण आहे यासीन मलिक
यासीन मलिक हा फुटीरतावादी नेता असून तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. काश्मीरच्या राजकारणात तो नेहमीच सक्रिय राहिला आहेत. तरुणांना भडकवण्याचा आणि हातात बंदूक घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
काश्मिरातील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला २०२२ साली एनआयए कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी पुरवणे आणि दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवणे यासंबंधी अनेक गुन्हे यासीनवर   दाखल आहेत.
२५जानेवारी १९९० रोजी श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप मलिकवर आहे. या घटनेत ४० जण जखमी झाले, तर चार जवान शहीद झाले होते. स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना हे त्यापैकीच एक. हे सर्वजण विमानतळावर जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
यासीनने १९९० मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या करून त्यांना खोरे सोडण्यास भाग पाडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासीनवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणाचादेखील आरोप आहे.
पत्रिका ११.११.२४