१९८९ साली प्रथमच भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या जास्त म्हणजे ८५ जागा मिळाल्या, तेव्हापासून भारतीय राजकारणाची दिशा बदलून, हिंदुत्वाकडे वळलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर २००४ सालापासून २०१४ पर्यंत याला जरा खीळ बसली परंतु २०१४ सालापासून पुन्हा भारतीय जनता पार्टीला मिळणाऱ्या जागा आणि त्या पक्षाचा आपल्या देशावरील प्रभाव हा अतिशय महत्वाचा बदल म्हणावा लागेल. भारतीय राजकारणावरील डाव्या विचारसरणीचा प्रभाव कमी होऊन भारतीय जनता पार्टीने ज्या विचारसरणीला प्राधान्य दिले अशा 'हिंदुत्व' किंवा 'हिंदू राष्ट्रवाद' याला महत्व प्राप्त झालेले दिसून येते.
नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या निवडणुकीत ही विचारसरणी समाजात मजबूत झाली असल्याचा परिणाम आपल्याला दिसून आला. सध्याचा भारतीय मतदार सातत्याने हिंदू राष्ट्रवादाकडे आकर्षित होताना दिसतो आहे. त्याला भारतीय जनता पार्टीने भारतीयांच्या मनात जागृत केलेला हिंदू राष्ट्रवाद आवडतो आहे. पण हा बदलणारा मतप्रवाह विरोधकांना किंवा डाव्या विचारसरणीला पचवता येत नाही. त्यामुळे ते याला 'निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक चूक' किंवा 'इव्हीएम मशीन्स हॅक केली गेली' यासारखे आरोप करून तसेच 'आमच्या उमेदवारांना इडी घोटाळ्यात अडकवले गेले' यासारखे मुद्दे पुढे करून आपल्या पराभवाबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा सगळा कांगावा आहे ते जनता ओळखते हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या विचारसरणीची सलग हार होताना दिसते आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. भारतीय जनता पार्टी नव्हे; तर तिच्या विचारसरणीचा स्वीकार केला जातो आहे हे जोवर डाव्या विचारसरणीच्या लोकांना समजणार नाही तोवर त्यांचा विजय शक्य नाही हे अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे जे अजिबात चुकीचे नाही.
हरयाणासारख्या राज्याने हिंदू राष्ट्रवादाला जवळ केले आणि केवळ सहा महिन्यात तिथे बदल घडून आला. याआधीचा निकाल वैचारिक मतभेदांमुळे होता परंतु जेव्हा हा मतभेद मिटला तेव्हा लोकांनी पुन्हा भाजपच्या बाजूने कौल दिला.
बांगलादेशात हिंदुंवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने दिलेली 'बटेंगे तो कटेंगे' ची घोषणा, याचे सकारात्मक पडसाद पुढील अनेक वर्ष पडत राहणार आहेत. या पार्टीकडे योग्य असे विचार आहेत, योग्य विचार पोहोचवण्याची साधने आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, नेते आहेत आणि यातील नेत्यांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे या विचारांना मान्यता देणारे मतदार वाढत आहेत, याची जाणीव डाव्या विचारसरणीला जोवर होत नाही तोवर त्यांची हार निश्चित आहे. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की आता 'हिंदुत्व' ही भारतीय राजकारणाची विचारधारा बनली आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षात ही विचारसरणी ते बदलू शकले असते पण त्यांना ते जमलं नाही. पैसा, भ्रष्टाचार, मुस्लिम लांगूलचालन यात ते अडकत गेले. मात्र, आता ही हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कुणीही बदलू शकणार नाही. ही विचारसरणी आजच्या राजकारणाचे 'स्टिअरींग व्हील' बनले आहे जे बदलणे पुढील काही वर्षं तरी कुणालाही शक्य नाही. 'आम्ही मतांसाठी मुस्लिम लांगूलचालन करणार नाही' असे जाहीरपणे सांगणारा पक्ष लोकांना हवाहवासा वाटतो आहे.
हे कसे घडले? : २३ नोव्हेंबर २०२४ हा हिंदू समाजासाठी अंतर्गत परिवर्तनाचा दिवस ठरला आहे. कारण, भाजप आणि मित्रपक्षांनी महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला. हिंदू समाजाच्या जागृतीने केवळ या निवडणुकीसाठीच नव्हे, तर भविष्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सनातन तत्त्वे लक्षात घेऊन, विकासासाठी कसे कार्य करू शकतात, याची व्याख्या केली. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शक्तींनी एनडीएची बाजू कशी मजबूत केली, अकल्पनीय स्ट्राईक रेटने भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या, अभूतपूर्व यशात कोणत्या घटकांचा हातभार लागला, याचा आढावा घेऊया.
'आयडिया ऑफ इंडिया' आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांच्या विरोधात 'डीप स्टेट' शक्तीने केलेली खोटी मांडणी, तसेच राहुल गांधी आणि 'इंडी' आघाडीला मिळणारा 'डीप स्टेट' शक्तींचा भक्कम पाठिंबा, यामुळे हिंदू मतदारांचे झालेले विभाजन याचा लोकसभेत भाजपला मोठा फटका बसला होता. जात, संविधान आणि आरक्षणाच्या आधारावर जनतेत मोठी फूट निर्माण झाली. पंतप्रधान मोदींनी पुन्हा केंद्रात सरकार स्थापन केले. पण, यावेळी स्वबळावर बहुमत न मिळवता आल्याने, हिंदुत्वविरोधी राजकीय शक्तींनी, सनातन धर्म आणि मोदी सरकारवर भयंकर वैचारिक हल्ला चढवला. याविरुद्ध रा. स्व. संघ, विहिंपसारख्या हिंदुत्ववादी शक्ती, हिंदू धार्मिक आणि अध्यात्मिक संत आणि त्यांच्या संघटना पुढे आल्या. हिंदुत्वासाठी हिंदुंना एकत्र करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न केले याची चुणूक या निवडणुकीत दिसली. हिंदुत्वाचे हे काम आता पुढेही असेच सुरू राहणार आहे.
हिंदुत्ववादी शक्ती प्रत्यक्ष कसा बदल घडवून आणत आहेत ? : रा. स्व. संघ, 'विश्व हिंदू परिषद' आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने धार्मिक आणि आध्यात्मिक गुरुंनी एकत्र येऊन 'वक्फ बोर्ड कायदा', 'लव्ह जिहाद', 'शरिया कायदा', 'व्होट जिहाद', 'मदरसा द्वेषयुक्त शिक्षण आणि त्याचा निधी', हिंदुंचे धर्मांतरण आणि त्याचे घातक परिणाम, यांच्या धोक्यांबद्दल जनतेमध्ये जागरुकता वाढवली. त्यांनी हिंदुंच्या एकजुटीनेच संविधानाला विध्वंसक शक्तींपासून कसे वाचवता येईल, यासाठी मानसिकता तयार करण्यास सुरुवात केली. एकता किती महत्त्वाची आहे, हे हिंदुंनी ओळखले त्यामुळेच मतांची टक्केवारी वाढली.
विशेष घोषणांचा निवडणुकीवर पडणारा परिणाम : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' आणि 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणांनी, हिंदुंमध्ये प्रचंड जागरण निर्माण केले. श्रेष्ठत्व आणि कनिष्ठतेच्या मर्यादित जातीय वृत्ती तुटल्या आणि हिंदुंनी एकजुटीने मतदान केले. मुस्लीम नेते सज्जाद नोमानी आणि इतर मौलवी आणि मुस्लीम संघटनांनी, मविआला मतदान करण्याचा फतवा जारी केल्यानेदेखील हिंदू ऐक्य वाढले. धुळ्यातील लोकसभेच्या जागेवरून 'व्होट जिहाद' चे गांभीर्य हिंदुंच्या लक्षात आले.
जर 'व्होट जिहाद'च्या परिणामामुळे महाराष्ट्र धर्म आणि सनातन धर्माच्या विरोधात मुस्लिमांच्या १७ मागण्या पूर्ण करणारे सरकार स्थापन झाले, तर ते संपूर्ण समाजासाठी किती घातक ठरेल, हिंदू समाजासाठी धोकादायक ठरेल याचा विचार हिंदुंनी करायला सुरुवात केली. हिंदुत्ववादी शक्तींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हिंदू एकता बळकट झाली. तसेच हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या आणि शरियाचे समर्थन करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना, हिंदुंना गृहीत धरले जाऊ नये, त्यांना द्वितीय श्रेणीचे नागरिक मानू नये असा मजबूत संकेत दिला.
बांगलादेश आणि जम्मू काश्मिरातील घटनांचे पडसाद : शेजारच्या बांगलादेशातील हंगामी सरकारने त्या देशाला मुस्लिम राष्ट्र घोषित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यापूर्वी तिथे झालेल्या सत्ता पालटानंतर हिंदुंचे झालेले भयानक शिरकाण भारतातील हिंदुंनी पाहिले. जगात ५७ मुस्लिम देश आहेत त्यात अजून एका देशाची भर पडेल! हिंदुंसाठी केवळ एकच देश आहे तो म्हणजे 'भारत' हे लोकांच्या मनावर ठसले.
काँग्रेसला लोकसभेत ९० जागा मिळाल्यावर काश्मीरमधील दहशतवादी कारवायांनी उचल खाल्ली. हिंदुंवर पुन्हा हल्ले सुरू झाले. पश्चिम बंगाल, आसाम, मुंबई येथील रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे होणारा भयानक उपद्रव स्थानिक जनता (प्रामुख्याने हिंदू) भोगते आहे, हेही लोक बघताहेत.
केवळ धर्माच्या आधारावर मते न मागता महायुतीने केलेली विकासकामे, विविध समाजघटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना घेऊन युती मतदारांसमोर गेली. यातून येणाऱ्या स्थैर्यासाठी आवश्यक असते ती शांतता. पण ती मिळण्यात दैनंदिन आयुष्यातदेखील धर्मांध मुस्लिमांचा कसा त्रास होतो हे देशाच्या कानाकोपऱ्यात रोज घडणाऱ्या विविध घटनांमुळे लोक बघत होते. त्याचाही परिणाम मतदानावर झाला.
काही विशिष्ट भागातून घरांच्या गच्चीवरून सहज येणारे दगड आणि समोर येणारे तलवारधारी बघता बघता एखाद्या मिरवणुकीचे रूपांतर दंगलीत करून टाकतात हे येथील बहुसंख्य सातत्याने बघताहेत. सामाजिक माध्यमांमुळे घुसखोरांची दादागिरी लोकांपर्यंत सहज पोहोचते. या सगळ्याचा परिणाम होऊन हिंदू हित जपणारे सरकार सत्तेवर आले पाहिजे ही भावना लोकांमध्ये प्रबळ झाली. पद्धतशीर नियोजन करून लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्यात आले , त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसून आला. त्यामुळे हिंदू राष्ट्रवाद पुढे नेणारी ही निवडणूक आणि त्यापुढील अनेक निवडणूका भारतीय राजकारणाची कूस बदलवणाऱ्या ठरतील हे नक्की.
मुं. तरुण भारत २५.११.२४
आपका अखबार (यु-ट्युब)