सत्तेची सावली समाजावर पडते. राजा वाचाळ तर प्रजा वाचाळ. वाचाळांच्या बरळण्याने त्यांचे तर भले होत नाही; ते आपल्या संगतीत असणाऱ्यांचाही नाश ओढवून घेतात. बोलताना असे बोलावे की पोळ्यातून जसा मध टपकावा. कसं बोलावं यासाठी ज्ञानेश्वरीचा सतरावा अध्याय उघडा. परीसाला लोखंडाचे सोने करण्यासाठी त्याचे तुकडे करावे लागत नाहीत. एखाद्याला रागावताना प्रत्येक वेळी त्याच्या काळजावर घाव घालणारे शब्दांचे बाण सोडणे आवश्यक नसते. आपल्या बोलण्याने सर्वांचे हित व्हावे. शब्दाला शब्दबह्म मानलेले आहे. त्याची उपासना व्हावी, उपेक्षा नको. वाचाशुद्धतेचा आग्रह असावा तरच वाचासिद्धी होईल. योग्य जागी योग्य शब्द वापरणे हे वाणीचे तप. शब्द अमृताप्रमाणे असावेत. माऊली म्हणतात,
साच आणि मवाळ |
मितुले आणि रसाळ|
शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे ||
अॅग्रोवन १.९.२३