मोहोळ- शहरातील एक दोनशे वर्षांपूर्वीची विहीर परिसरातील लोकांनी कचरा टाकल्याने बुजली होती. चाटे गल्लीत राहणाऱ्या पिसे कुटुंबाची ही विहीर. ते तिथून निघून गेले आणि विहिरीला अवकळा आली. विहीर बुजलीच! दरम्यान मोहोळ शहराची लोकसंख्या वाढत गेली. पावसाळ्यातही माता-भगिनींच्या डोक्यावर पाण्याचे हंडे दिसू लागले. पाणीटंचाईची ही दाहकता दूर करण्यासाठी राहुल तावसकर आणि अमोल महामुनी यांनी या विहिरीतील गाळ काढण्याचे ठरवले. लोकवर्गणीतून निधी जमवला आणि कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय तब्बल १३८ दिवस या विहिरीतील गाळ काढला. एकूण १९ ट्रॅक्टर ट्रॉलीज भरून गाळ निघाला. विहिरीचे झरे मोकळे झाल्याने विहिरीला पाणी आले. मग मोहोळ नगरपरिषदेने विहिरीतील उरलेला गाळ काढला.
उपलब्ध पाणी उपसण्यासाठी दिनेश धोत्रे यांनी स्वखर्चाने पाईपलाईन करून दिली. प्रत्येकाच्या दारात नळजोडणी करून दिली. तीन मित्रांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या या उपक्रमामुळे या भागातील ४५०० लोकांची मोफत पाण्याची सोय झाली.
सामना १६/३/२४