उर्दू भाषा येणारे बहुतेक जण शेरोशायरी मध्येच अडकून पडतात. त्यांचा उर्दूचा अभ्यास त्यापलीकडे फारसा जात नाही. संघ प्रचारक कै. विश्वासराव ताम्हणकर हे उर्दू आणि फारसी भाषांचे जाणकार. “शेकडो वर्षे मुसलमान समाज आपल्याबरोबर राहतो आहे. पण आपण मुसलमानांचा इस्लाम धर्म नेमका कसा आहे हे केवळ ऐकीव गोष्टींवरून ठरवतो. त्यांचे धर्मग्रंथ वाचून त्यांचा धर्म समजावून घेण्याचा कोणी फारसा प्रयत्न केला नाही “ असे विचार मांडून ते थांबले नाहीत तर त्यांनी स्वत:हून पुस्तकांच्या आधारे उर्दू भाषेचा अभ्यास केला आणि त्यावर प्रभुत्त्व मिळवले.
मुस्लीम विद्वानांच्या लेखांचा मतितार्थ सर्व सामान्य लोकांना समजावा म्हणून त्या लेखांचा भावानुवाद करून ते सांस्कृतिक वार्तापत्रातील ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ हे सदर चालवत असत. ताम्हणकरांच्या निधनानंतर त्यातील निवडक लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आला.
‘फक्त निषेधाने काय होणार?’ हा पुस्तकातला पहिला लेख. हमास या आतंकवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले . त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला. त्यामुळे मुस्लीम समाज संतप्त झाला त्यावेळच्या भावना या लेखात आहेत. केवळ आपला धर्म आणि त्या धर्माचे लोक खरे; बाकी इतर धर्मीय जगले काय आणि मेले काय, इस्लाम धर्मियांना त्याबद्दल काहीही वाटत नाही. ‘आम्हीच कसे खरे’ हे ते पटवून देतात.
‘आर एस एस हिंदू धर्मच बदलतो आहे’, ‘भागवतजी, अखंड भारत बनवणे तुमच्या हातात नाही’, ‘इस्लाम प्रचाराचे काम हिमतीने आणि युक्तीने केले पाहिजे’ ही आणखी काही लेखांची शीर्षके. काही लेख अतिशय एकांगी वाटतात मात्र काही लेखांचे विषय खरोखर विचार करून लिहिलेले आहेत. ‘मादक पदार्थांच्या कारभारात मुस्लिम तरुण’ हा वस्तुस्थितीला धरून लिहिलेला लेख त्याचे उदाहरण आहे. बेरोजगारी, व्यसनाधीनता, अमली पदार्थांचा अवैध व्यापार हे खरे मुस्लिम समाजातील प्रश्न आहेत. त्यावर क्वचित मंथन झालेले दिसते. बाकी विषय धार्मिक कट्टरतेच्या चष्म्यातूनच मांडलेले आहेत.
ज्या व्यक्तीला इस्लाम समजला आहे तीच व्यक्ती मुस्लिम विद्वानांच्या लेखातील गर्भित अर्थ समजू शकते. मुंबई उर्दू न्यूज, उर्दू टाईम्स, सहारा रोजनामा अशा अनेक नियतकालीकातील वेगवेगळ्या उर्दू विचारवंतांनी त्यांच्या चष्म्यातून मांडलेले विचार या लेखांमध्ये आहे. ते वाचताना त्यांची विचारप्रकृती कळते; धारणांचा रोख लक्षात येतो. विचारांची लढाई विचारांनी करायची तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.
४८ पानांचे हे छोटेखानी पुस्तक राजकीय अभ्यासकांना आणि सामान्य वाचकांनाही उपयुक्त आहे.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण
१. भारतीय विचार साधना, पुणे १. भाविसा भवन, १२१४/१५