खोदकामात सापडले होते अख्खे मंदिर

SV    20-May-2024
Total Views |
 
       आपल्या देशात अनेक अनोखी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात, विविध कारणांमुळे लोकांच्या दृष्टीआड जात असतात. कधी पाण्याखाली, कधी जमिनीखाली तर कधी वाळूखाली अशी मंदिरे, मूर्ती सापडत असतात.कर्नाटकात बंगळूरच्या वायव्येस असलेले  श्री दक्षिणमुखी नंदीतीर्थ कल्याणी क्षेत्र मंदिरही असेच खोदकामात सापडले होते. तेथील नंदीच्या मुखातून अखंड जलधारा बाहेर पडत असते व हे पाणी नंदीच्या खालच्या भागात असलेल्या शिवलिंगावर अखंड जलाभिषेक करते. नंदीच्या मुखातून हे पाणी कुठून येते हे आजपर्यंत समजलेले नाही ! हा नंदी व त्याखालील शिवलिंग सुंदर पायऱ्या असलेल्या एका जलकुंडाच्या (कल्याणी) काठाला आहे. जेव्हा काही मजूर या परिसरात खोदकाम करत होते. तेव्हा खाली त्यांना आकृतीसारखी एक वस्तू लागली. त्यानंतर तेव्हा संपूर्ण केले गेले तर जमिनीखाली नंदीची प्रतिमा सापडली. आश्चर्य म्हणजे, या नंदीच्या  मुखातून सातत्याने पाणी खाली वाहत होते. हे पाणी कुठून वाहतेय याचा शोध मात्र काही लागला नाही. नंदीच्या मुखातून पाणी कुठे पडते याचा शोध घेण्यासाठी आणखी खोदकाम करण्यात आले. तेव्हा जमिनीच्या खाली एक शिवलिंग असल्याचे आढळले. त्यावर नंदी अभिषेक करतात. हे पाणी नंतर कुंडात जाते.पुरातत्त्व विभागाकडून मंदिराचा इतिहास आणि वय जाणून घेण्यासाठी कार्बन डेटिंग करण्यात आले. तेव्हा हे मंदिर ४०० वर्षे जुने असल्याचे समोर आले. गेली अनेक वर्षे हे मंदिर जमिनीखाली होते. १९९७ साली हे मंदिर पुन्हा  समोर आले.

पुढारी १९.११.२३