महिला तस्करीपासून महिलांना सोडविणाऱ्या – रंगू सोरेय्या

SV    25-May-2024
Total Views |
 
 बिहार, ओडिशा, झारखंड, सिक्कीम, आसाम ही राज्ये पश्चिम बंगालच्या सीमेवर आहेत तर नेपाळ व भूतान हे देश आंतरराष्ट्रीय सीमेवर आहेत. या राज्यांमधील व देशांमधील दारिद्रय, शिक्षण व रोजगाराच्या संधी, महिलांकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टीकोन यामुळे लैंगिक तस्करीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. कधी नोकरीचे आमिष दाखवून, कधी लग्नाची वचने देऊन तरुण मुलीना देहविक्रीत किंवा बंधमजूरीत ओढले जाते व त्यांची विक्री होते.  इथून त्यांची नरकयातना सुरू होते.  
अशा अनेक मुलींना या संकटातून सोडविण्याच्या कार्याला वाहून घेतलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रंगू सोरेय्या यांना या वर्षीचा ‘बाया कर्वे पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘कांचनजंगा उद्धार केंद्र, सिलिगुडी’ या संस्थेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे त्या काम करीत आहेत.
या पीडितांसाठी काम करण्याच्या प्रबळ इच्छेतून सोरेय्या यांनी मित्र-मैत्रिणींना बरोबर घेऊन कामाला सुरुवात केली. मुलींना सोडवण्यासाठी त्या अनेकदा पुणे, हैदराबाद, दिल्ली अशा शहरांमध्ये गेल्या. तिथे आधी पाहणी करुन, अशा मुली तिथे असल्याची खात्री झाल्यावर, स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळवून त्या हे जोखमीचे   काम   करतात. यासाठी मोठे मानसिक धैर्य, संयम आणि समयसूचकता असावी लागते. प्रसंगी जीवावर बेतणारे प्रसंगही त्यांनी अनुभवले.
रंगू सोरेय्या सांगतात, “सुरुवातीच्या काळात हा तस्करीचा प्रकार आहे हे प्रशासनाला मान्य नसायचे. त्यामुळे गुन्हा नोंदवून घेणे, खटला उभा राहणे, आरोपीला शिक्षा  होणे, प्रशासन व पोलीस यंत्रणा आणि मुलीचे कुटुंबीय यांचे सहकार्य मिळवणे हे आव्हान असायचे. आता परिस्थिती बदलते आहे”
संभाव्य ठिकाणावर हॉटेल, रेल्वे/बस स्थानके, सीमा ओलांडणाऱ्या पायवाटा यावर लक्ष ठेवून या मुलींची सुटका सोरेय्या यांच्या संस्थेमार्फत केली जाते. त्यांनी आजवर सोडवलेल्या ११०० मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत अरब देशात विकल्या गेलेल्या ५ मुलींचाही समावेश आहे. मुलींना सोडवून आणल्यानंतर त्यांना पायावर उभे करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे ही कामे त्यांची संस्था करते.  रंगू सोरेय्या यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा !!
सकाळ २९/११/२३