सचिन कारेकर यांनी विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण

SV    08-May-2024
Total Views |
 
 आबलोली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील युवा शेतकरी सचिन कारेकर यांची वडिलोपार्जित आंबा, काजू, नारळ, पोफळी अशी बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. सन १९९५ मध्ये १२ वी शिक्षणानंतर सचिन यांनी वडिलांच्या हाताखाली शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली.
सन १९९७ मध्ये त्यांना सांगली भागातील परिचयाचे शेतकरी शेंडगे काका यांच्याकडून सांगली कडप्पा हळदीचे २० ते २५ कंद मिळाले. त्या माध्यमातून त्यांचा हळद लागवडीत प्रवेश झाला.
नवीन वाण विकसित
प्रयोगशील व अभ्यासू वृत्तीच्या सचिन यांनी हळदीत प्रयोग सुरू केले. त्यातून सचिन यांना निवड पद्धतीने हळदीचे वाण विकसित करण्यात यश आले.त्याचे एसके ४ (फोर) असे नाव ठेवले. यात एस नावाचे आद्याक्षर असलेली चार नावे दडली आहेत. बेणे देणारे शेडगे काका, मूळ जात सांगली कडप्पा, कोकणासाठी विशेष म्हणून कोकण स्पेशल आणि स्वतः शेतकरी सचिन असे हे चार एस आहेत.
पीक व्यवस्थापन, वाण प्रसार
सचिन दहा गुंठ्यांत लागवड करतात. तीन हजार ते २५०० रोपे लागतात.लागवड साधारण १५ जूनपर्यंत असते. लागवडीसाठी पन्नास टक्के ऊन आणि पन्नास टक्के सावलीचा भाग असणे अपेक्षित आहे. गिरीपुष्पाचा पाला वापरल्यामुळे तण येत नाही.  सध्या  कृषी विभागाच्या साह्याने वर्षाला एक लाखांपर्यंत रोपे तयार होत आहेत.
वाणाच्या चाचण्या व प्रमाणपत्र
गुजरात येथील 'नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ) संस्थेकडून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाला या वाणाच्या चाचण्या घेण्यासाठी निधी देण्यात आला. मागील वर्षी 'एनआयएफ'कडून सचिन यांना नवी दिल्ली येथील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते द्वितीय पुरस्कार व प्रमाणपत्र बहाल करून सन्मानित केले आहे.
कृषी पर्यटनातून उत्पन्न साधन
कोकणातील निसर्गसौंदर्याचा उपयोग करून सचिन यांनी पाच वर्षांपासून कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. दहा ते पंधरा व्यक्तींसाठी सहा खोल्या बांधल्या आहेत. आजूबाजूला जंगल असल्याने येथे शंभरहून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. त्यासाठी असंख्य पर्यटकांची येथे गर्दी असते.
अॅग्रोवन १९/३/२४