प्रांजळ आणि दयाळू

SV    09-May-2024
Total Views |
 

आदि शंकराचार्य आश्रमात राहून शिक्षण घेत होते. त्याचे गुरु आणि इतर सहाध्यायी त्यांची कुशाग्र बुद्धिमत्तेला आणि प्रतिभा यामुळे खूप थक्क झाले होते. आश्रमवासी उदरनिर्वाहासाठी शहरात भिक्षा मागण्यासाठी जात असत. आश्रमाचा नियम असा होता की विद्यार्थ्याला एकाच घरातून भिक्षा मागता येईल आणि त्या घरातून जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागेल. एके दिवशी शंकराचार्य एका गरीब वृद्ध स्त्रीच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तिच्याकडे फक्त मूठभर तांदूळ होते. तेच तिने शंकराचार्यांना दिले. शंकराचार्य आश्रमाचे नियम मोडून शेजारच्या एका शेठजीच्या घरी गेले. शेठाणीने एक मोठे ताट आणले, ज्यात विविध पदार्थ होते. पण शंकराचार्यांनी ती भिक्षा आपल्या झोळीत  घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, 'आई, ही भिक्षा शेजारी राहणाऱ्या गरीब वृद्ध स्त्रीला दे.' शेठाणीने त्याप्रमाणे केले. शंकराचार्य शेठाणीला म्हणाले, 'आई, मला तुमच्याकडून आणखी एक भिक्षा हवी आहे. जोपर्यंत ती आई आहे तोपर्यंत तुम्ही तिची काळजी घ्या आणि आधार द्या. मला ही भिक्षा द्याल का?' शेठाणीने  आनंदाने होकार दिला.
शंकराचार्य तांदूळ घेऊन प्रसन्न मनस्थितीत आश्रमात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर ते आपल्या गुरूंना म्हणाले, 'गुरुदेव, आज मी आश्रमाचे नियम  मोडले आहेत. मी एक नाही तर दोन घरांत भिक्षा मागायला गेलो. मी गुन्हा केला आहे.' त्यावर गुरुजी म्हणाले, 'शंकर, मला सर्व काही कळले आहे. आश्रमाचा नियम तू मोडलास पण तू त्या असहाय्य वृद्ध महिलेला मदत केलीस यात काहीही चुकीचे केले नाही. हे एक पुण्यकर्म आहे. तू एक दिवस खूप मोठा होशील आणि जगभरात प्रसिद्ध होशील.'  गुरूंचे हे भाकीत खरे ठरले.

 पांचजन्य १८/२/२४