अंदमानच्या रंगाचांग या गावात रहाणाऱ्या के. चेल्लामल यांना 'नारियल अम्मा' या नावाने ओळखले जाते. नारळांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी जैविक खतांचा वापर सुरू केल्याने जमिनीची सुपीकता तर टिकून राहिलीच शिवाय उत्पादनातही वाढ झाली ! ताड व नारळाच्या झाडांचे किडींमुळे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या व त्याविषयी इतरांना मार्गदर्शनही केले. या त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून २०२४ च्या 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
पावसाळ्यानंतरच्या ऋतूंमध्ये जमिनीतील ओलावा टिकून रहाण्यासाठी त्यांनी नारळांच्या रोपांभोवती भुसा, नारळाच्या झावळ्यांच्या उपयोग केला. झाडांवरील किडीला प्रतिबंध करण्यासाठी रासायनिक औषधांऐवजी नैसर्गिक औषधांऐवजी नैसर्गिक औषधे व एकीकृत कीटक प्रतिबंधाची योजना राबवली. यामुळे किटकांच्या वाढीला प्रतिबंध झाला. नारळाच्या उत्पादनाबरोबर रताळी, केळी, शेंगदाणे, अननस, हिरव्या फळभाज्यांची लागवड शास्त्रीय पद्धतीने केल्याने कमी जागेत जास्त उत्पादन घेणे शक्य झाले. शालेय शिक्षण कमी झाले असले तरी निरीक्षण, अनुभव, नवीन कल्पनांचा वापर करण्याची वृत्ती यामुळे शेती क्षेत्रात अनेकानेक प्रयोग त्यांनी केले. परिणामी उत्पादकताही वाढली, उत्पन्नातही वाढ झाली. अंदमानातील ४६० ताडांच्या बागांमधील झाडांपासून २७,००० पेक्षा अधिक नारळांचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे.
दृष्टी स्त्री अध्ययन, मार्च २०२४