आसाम राज्य हे कामाख्या देवीचे शक्तीपीठ म्हणून जगविख्यात आहे. त्याचे अध्यात्मिक महत्त्वही फार मोठे आहे पण या राज्यात ऐतिहासिक स्थळे देखील भरपूर आहेत. म्हणूनच देशोदेशीचे कला आणि इतिहास प्रेमी या राज्यात पर्यटनासाठी येतात. या ऐतिहासिक स्थळांत आसामच्या रंग घराचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या रंग घराची रचना आणि इतिहास फारच रंजक आहे.
राजे महाराजांच्या मनोरंजनाचे हे ठिकाण होते!
रंग घराला बोली भाषेत 'रोंग घर' असेही म्हणतात. 'रंग घर' म्हणजे 'मनोरंजनासाठी असलेले घर'. हे आशियातील सर्वात जुन्या प्रेक्षागृहांपैकी एक मानले जाते. इसवी सन 1696 मध्ये स्वर्गदेव रुद्र सिंह यांच्या कारकिर्दीत वेळू आणि लाकडांचा वापर करून ही इमारत बांधण्यात आली. इसवी सन 1744 ते 1751 मध्ये स्वर्गदेव प्रमत्त सिंह यांनी विटांचा वापर करून या इमारतीची पुनर्बांधणी केली. ही दुमजली इमारत शिवसागर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. ही जागा राजेशाही काळात 'साहसी खेळांची राजधानी' म्हणून महत्त्वाची मानली जाई. रंग घरात अहोम राजा आणि राज्यातील इतर धनिकांसाठी बैल, कोंबडे, हत्ती यांच्या झुंजी तसेच कुस्तीसारख्या चित्तथरारक खेळांचे आयोजन केले जाई. राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि शेजारील राज्यांमध्ये खेळाची महती आणि प्रसार करण्याचे काम या रंग घराने केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मगरींची जोडी कोरलेले शिल्प
रंग घराची रचना तसेच स्थापत्य शैली असामान्य आहे. या इमारतीच्या छताचा आकार उलट्या आणि लांब शाही अहोम नावेसारखा आहे. इमारतीच्या पायथ्याशी महिरपी प्रवेशद्वारांची मालिका आहे. छताच्या वरच्या बाजूस सुशोभीकरणासाठी दगडात मगरींची जोडी कोरलेली आहे.
भूकंपानेही झाले मोठे नुकसान!
2007 मध्ये आसाम राज्यात आयोजित केलेल्या 33 व्या राष्ट्रीय खेळांचे प्रतीक म्हणून रंग घराची निवड करण्यात आली होती. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे रंग घराचे बरेच नुकसान आहे असे म्हटले जाते. इमारतीच्या भिंतीवर जवळपास 35 भेगा दिसून येतात तरीही भव्य इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
दैनिक भास्कर 31.3.24