गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेने (ATS) इस्लामिक स्टेट (ISIS) च्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतून आले होते. आता पोलिसांच्या चौकशीत चौघांनीही भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. मोहम्मद नुसरत, मोहम्मद नुफ्रान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद रझदीन नावाचे हे दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे रहिवासी असून ते चेन्नईहून ट्रेन किंवा विमानाने अहमदाबादला पोहोचणार होते. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी कोलंबो अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. या चौघांना श्रीलंकेतच आत्मघातकी हल्ला करण्याची शपथ देण्यात आली होती.
हे चार दहशतवादी चेन्नईहून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने आले होते. चौघांची तिकिटे एकाच 'पीएनआर' वर होती. विमानतळावर चेन्नईहून येणाऱ्या प्रवाशांची यादी तपासली असता चौघांची नावे जुळली आणि त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी या दहशतवाद्यांचे फोन तपासले. झडतीदरम्यान त्याच्या फोनवरून अहमदाबादमध्ये ठेवलेल्या शस्त्रास्त्रांचे लोकेशन उघड झाले पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे तीन पिस्तुले आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली. चार दहशतवाद्यांना अटक केली, त्यांच्या दुसऱ्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या संघांसह हजारो प्रेक्षकही जमणार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण तेथे मोठा घातपात करण्यासाठी आले होते. मात्र, या दहशतवाद्यांना त्यांचा मनसुबा अमलात आणण्यापूर्वीच अटक करण्यात आली.
ऑपइंडिया २२.५.२४