चंदन तथा हळद- कुंकू का लावायचे ?

SV    10-Jan-2025
Total Views |
 
 मागच्या दोन भागात आपण ऋतुमानानुसार जे सण साजरे करतो त्यामागे असणारी शास्त्रीय कारणं जाणून घेतली. आजच्या भागात आपण पाळत असलेल्या काही  प्रथांबद्दल जाणून घेऊ.
आपल्याकडे पुरुषांनी कपाळाला गंध लावायची पद्धत आहे. तसेच स्त्रिया कपाळाला हळदकुंकू लावतात, त्यामागे असणारे शास्त्रीय कारण आज जाणून घेऊ.
आपला देश हा उष्ण कटिबंधात मोडतो. त्यामुळे हवेतील उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी थंड असणारे चंदन वापरण्याची पद्धत सुरू झाली. दक्षिणेकडची राज्यं जिथे अधिक उष्णता असते तिथे ही पद्धत आपल्याला अधिक दिसून येते. हातावर, कपाळावर चंदनाचे पट्टे लावून अंगातली उष्णता कमी केली जाते. काही देवळातील  पुजारी तथा इतर सेवक चंदनाचे पट्टे कपाळावर, हातावर लावताना आजही दिसतात. पण व्यावहारिक दृष्टीने सगळ्यांनाच इतकं चंदन लावणं शक्य नसतं मग त्यावर उपाय म्हणून कपाळाला चंदन लावण्याची पद्धत रूढ झाली.
आपले योगशास्त्र सांगते की भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र किंवा अग्याचक्र असते. त्याला 'तिसरा                डोळा' असेही  म्हटले जाते,  हे चक्र अंतर्ज्ञान, आंतरिक शहाणपणाशी संबंधित आहे. त्यामुळे यातून उर्जा बाहेर पडू नये यासाठी ते झाकून ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी त्यावर चंदन किंवा कुंकू लावून ते झाकले जाते.
याखेरीज स्त्रियांनी किंवा सवाष्ण स्त्रीने हळदी- कुंकू लावावे असे सांगितले जाते किंवा अशी पद्धत आपल्याकडे आहे त्यामागे किती खोल विचार आहे हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आपल्या सर्वाना माहीत आहे की हळद ही अतिशय औषधी आहे. तिचा उपयोग जखमेवर लावण्यासाठी केला जातो. सर्दी, खोकला यावरही हळद उपयुक्त असते. तसेच कुंकू हे सर्पदंशावर तसेच विंचवाचा दंश झाल्यास प्रथमोपचार म्हणून वापरता येऊ शकते. म्हणून हळद कुंकू अशा कुठल्याही प्रसंगात आपल्या हाताशी असावे या    दृष्टीने  ते रोजच्या वापरात अशा पद्धतीने ठेवले गेले.  पूर्वी लग्न झालेल्या स्त्रिया सौभाग्याची खूण म्हणून मळवट (कपाळभर आडवे कुंकू लावणे) भरत किंवा मोठे कुंकू लावत. यामागचे कारण असेही असू शकते की जर एखाद्या स्त्रीच्या पतीला सर्पदंश झाला किंवा विंचवाचा दंश झाला तर पत्नी आपल्या कपाळावरच्या कुंकवाचा उपयोग करून आपल्या पतीचा जीव वाचवू शकेल.
थोडक्यात चंदन तसेच हळदी-कुंकू यांच्यातील औषधी गुणांमुळे त्यांचा वापर सामान्य माणसाने करावा यासाठी केलेल्या या प्रथा म्हणता येतील.
            सौजन्य : रूढीमागचे विज्ञान, तन्मय केळकर