पानिपत-देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यात धावणार आहे. जानेवारी महिन्यात ही रेल्वे सोनिपत-जिंद दरम्यान धावू लागेल. जिंद रेल्वे स्थानकावर भूमिगत पाणी साठवणूक व्यवस्था तयार होत आहे. स्थानकाच्या छतावरील पाणी त्यात साठवले जाईल. देशातील ही पहिलीच प्रदूषणमुक्त रेल्वे ठरेल.
कशी काम करणार हायड्रोजन रेल्वे ?
हायड्रोजन इंधन वापरणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे. डिझेलऐवजी ही रेल्वे हायड्रोजन वायूवर वीज तयार करेल आणि त्यावर धावेल. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असे मिळून पाणी तयार होते हे विज्ञानाचे सूत्र आहे. याच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेमधून वीज तयार केली जाणार आहे. यातून केवळ पाणी आणि वाफ तयार होईल. हायड्रोजनचा वापर केल्यामुळे ही रेल्वे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडसारखे प्रदूषण निर्माण करणारे घटक तयार करणार नाही.
भारताने साल २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन गाठण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
टी.व्ही.९ मराठी १४.११.२४