चिनी जहाजातून पाकिस्तान माल बांगलादेशातील चितगांव बंदरात

SV    17-Jan-2025
Total Views |
 
 कराचीहून (Karachi) पाकिस्तानी (Pakistan) माल घेऊन आलेले   एक चिनी जहाज दि. १३ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील चितगाव बंदरात आले. १९७१ साली बांगलादेश मुक्ती युद्धानंतर प्रथमच एखादे पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या बंदरात पोहोचले. या जहाजातील सामानाची तपासणी करण्यात आली नाही. बांगलादेशातील सरकारने अशाप्रकारे सवलत देऊन पाकिस्तानी माल आणि भविष्यातील व्यापारासाठी एक वाट खुली करून दिली आहे. बांगलादेशात सध्या भारतविरोधी जनमत तीव्र असताना पाकिस्तानने बांगलादेशाशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यास बांगलादेशकडून प्रतिसादही आला म्हणून या घटनेचे विश्लेषण करणे जरुरी आहे.

पाकिस्तान-बांगलादेश (Pakistan-Bangladesh) संबंध अधिक दृढ होणार
१९७१ साली स्वातंत्र्ययुद्धानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश हे देश विभाजित झाले. या स्वातंत्र्ययुद्धात  लाखो लोक मारले गेले होते.  युद्धपूर्व काळातील वांशिक संहाराबद्दल पाकिस्तानने अद्याप बांगलादेशची माफी मागितलेली नाही, याबद्दल बांगलादेशातील राज्यकर्त्यांच्या मनातील राग कायम आहे. शेख हसीना या मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार  मुजीबूर रहमान यांची कन्या. हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशने पाकिस्तानला वेठीस धरले होते. दुसरीकडे त्यांनी बांगलादेश आणि भारताचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला. त्यांचा देशातील कट्टरतावाद्यांवर वचक होता. मात्र हसीना यांची हकालपट्टी झाल्यापासून, मोहम्मद युनूस सरकारने पाकिस्तानशी संबंध अधिक   दृढ केल्याचे दिसून येते. हसीनांच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तानची व्हिसा प्रक्रिया सुलभ झाली आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने  जाहीर केले की, 'बांगलादेशी, व्हिसाशुल्काशिवाय आमच्या  देशात प्रवास करू शकतात.'

बांगलादेशचे भारतावरील अवलंबित्व
बांगलादेशी अजूनही भारताच्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहेत. २०२१-२२ साली दोन्ही देशांदरम्यान सुमारे ७९९.२३ दशलक्ष डॉलर्स किमतीचा कापूस निर्यात झाला. बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ, गहू, साखर खरेदी करतो.
भारत-बांगलादेश व्यापार काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे आणि त्याच्याशी बरोबरी करण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. पण, पाकिस्तान-बांगलादेशाची जवळीक भारतासाठी धोक्याचे ठरू शकते. भारताविरुद्ध घातपाती सामग्री ठिकठिकाणी पाठवण्याचे काम पाकिस्तानने केले आहे. बांगलादेशातील भारतविरोधी जनमताचा फायदा उठवून तेथील काही माथेफिरूंपर्यंत अशी सामग्री पोहोचवणे अवघड  नाही. त्यामुळे ईशान्य भारतात शस्त्रास्त्रे, दारुगोळा, अफू, गांजा, चरस पाठवता येईल. घुसखोरांचा प्रश्न ही मोठी डोकेदुखी आहेच.

बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध नव्याने अधिक घट्ट होणे, ही भारतासाठी चिंतेची बाब  आहे.

मुंबई तरूण भारत १.१२.२४