उपक्रमातून वस्ती विकास

SV    20-Jan-2025
Total Views |
 
सेवा हेच ध्येय ठेऊन पुण्याजवळ असलेल्या चिंचवडमध्ये एका संस्थेचे कार्य गेली अठ्ठावीस वर्षे सातत्याने सुरू आहे. शिक्षण, वस्ती विकास, आरोग्य, संस्कार, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही संस्था म्हणजे चिंचवडमधील स्व. तात्या बापट स्मृती समिती. एका छोट्या जागेत या संस्थेचे कार्य सुरू झाले. त्याचा विविध क्षेत्रात लक्षणीय विस्तार झाला आहे.
चिंचवड आणि पिंपरी परिसरातील सेवावस्त्यां-मध्ये संस्थेचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अभ्यासिका हा त्यातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. संस्थेच्या अशा सात अभ्यासिका सुरू असून अभ्यासाबरोबरच तेथे विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक मार्गदर्शनही केले जाते. हे काम संबंधित अभ्यासिकेतील शिक्षक करतात. या शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचाही उपक्रम संस्थेतर्फे आयोजित केला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभ्यासिकेत सत्कार करून त्यांचे कौतुक केले जाते. सेवावस्त्यांमधील आरोग्य या विषयातही संस्थेचे काम सातत्याने सुरू आहे. त्यासाठी वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांत आरोग्य तपासणी, आजाराचे निदान, औषधोपचार आणि योग्य ते मार्गदर्शन अशा स्वरुपाची ही शिबिर असतात. वस्ती विकास प्रकल्पांतर्गत वस्ती स्वच्छता उपक्रमही केला जातो. महिलांसाठी शिवणकेंद्र चालवली जातात.
बालवाडी, अंगणवाडी, बालशिबिर, संस्कार वर्ग असेही उपक्रम संस्था करते. त्याचा या वयोगटातील मुलांना चांगला उपयोग होतो. अंगणवाडी चालवण्यासाठी स्थानिक महिलांनाच प्राधान्य दिले जाते. त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाते.
त्यामुळे अंगणवाडी शिक्षिका म्हणून त्या चांगल्या पद्धतीने काम करतात. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अनेक गुणी विद्यार्थ्यांपुढे जेव्हा शिक्षणाचा प्रश्न उभा राहतो. अशा विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी दत्तक योजना' ही एक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येते.
या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आवाहन संस्थांकडून करण्यात येतो. विशेष म्हणजे या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो. परिणामी होतकरू विद्यार्थी उत्तमरित्या शिक्षण घेऊ शकतात. ग्रामीण भागातही संस्था विविध समाजोपयोगी सेवाकार्य करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात प्रचारक ही एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे. तात्या बापट हेही संघाचे प्रचारक होते. त्यांच्याच कार्यापासून प्रेरणा घेऊन या संस्थेची १९९६ मध्ये स्थापना करण्यात आली.
वसतिगृहातील अनेक विद्यार्थी फुटबॉलमध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.
शैलेंद्र बोरकर
सकाळ ८.१२.२४