भारत आणि चीनदरम्यान सीमावादावरून निर्माण झालेला तणाव निवळत चालला असतानाच ड्रॅगनने पुन्हा लडाखच्या हद्दीत घुसखोरी करत दोन वेगळ्या काउंटींची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला आहे. चीनच्या या चिथावणीखोर कृत्याचा परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध करण्यात आला. ब्रह्मपुत्रा नदीवरदेखील चीनकडून उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाबाबत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वायव्य शिनजियांग उघूर स्वायत्त प्रदेशाकडून हेयान आणि हेकांग या दोन वेगळ्या काउंटींच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाची केंद्रीय समिती आणि स्टेट कौन्सिल यांनी या दोन नव्या काउंटींना मान्यता दिली आहे. होतान प्रशासनाकडून या दोन्ही काउंटीवर लक्ष ठेवण्यात येईल. चीनच्या या कृत्यावर भाष्य करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की या दोन्ही कथित काउंटी या लडाखमध्ये येतात. भारत स्वतःच्या हद्दीतील या बेकायदा चिनी घुसखोरीला कधीच मान्यता देऊ शकत नाही. चीनच्या या कृत्याबद्दल भारताने राजनैतिक मागनि निषेध नोंदविला आहे.
चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वांत मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून याबाबतही भारताने स्वतःच्या चिंता चिनी सरकारसमोर मांडल्या आहेत. या नदीच्या खालच्या भागामध्ये भारत येतो त्यामुळे भारताने सातत्याने या नदीच्या पाण्यावर स्वतःचा हक्क सांगितला आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून आणि राजनैतिक मागनि आम्ही याबाबतची आमची मते आणि चिंता मांडल्या आहेत. चीन सरकारला देखील याबाबत माहिती असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या भागामध्ये (उगमस्थानाच्या दिशेने) ज्या घडामोडी चालतात त्यांचा नदीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाहाच्या प्रदेशावर कोणताही परिणाम होता कामा नये. अन्य देशांच्या हितसंबंधांना त्यामुळे बाधा येता कामा नये. आम्ही आमच्या हिताची जपणूक करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखत राहू असेही जयस्वाल यांच्याकडून सांगण्यात आले.
सकाळ ०४/०१/२५