रत्नागिरीत आयोजीत केलेल्या तीन दिवसीय सागर महोत्सवामध्ये 'जीआयपीई' आणि 'एस. एल. किर्लोस्कर फाऊंडेशन'च्या माध्यमातून सुरू असलेल्या 'ओशन' या प्रकल्पाची माहिती देण्यात आली.
मच्छीमार हे बोटीमध्ये लुब्रिकंट किंवा इंजिन ऑईल टाकतात. ठराविक कालावधीनंतर हे इंजिन ऑईल बदलावे लागते, अशा वेळी वापरलेले इंजिन ऑईल म्हणजे वंगण तेल बहुतांश मच्छीमार समुद्रात फेकतात त्यामुळे सागरी प्रदूषण वाढते. एका मोठ्या जहाजामध्ये १५ लीटर इंजिन ऑईल भरले जाते. त्यापैकी दहा लीटर वंगण तेल, ज्याला 'जळके ऑईल' ही म्हणतात, ते वापरानंतर उरते. छोट्या बोटींमध्ये ७.५ लीटर इंजिन ऑईल भरल्यानंतर त्यातून ६.७ लीटर वंगण तेल उरते.
आता महाराष्ट्रात सुमारे १९ हजार नोंदणीकृत जहाजे आहेत आणि या जहाजामधून वापरण्याजोगे न राहिलेले किमान सहा लाख लीटर वंगण तेल हे समुद्रात टाकले जात आहे.
या समस्येवर उपाय काढण्यासाठी 'ओशन' प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ बंदरांवरील मच्छीमारांकडून वंगण तेल हे २० रुपये प्रतिलीटर दराने विकत घेतले जात आहे. विकत घेतलेले हे तेल पुण्यातील एका कंपनीला विकण्यासाठी पाठविण्यात येत आहे. यामुळे मच्छीमारांना रोजगार मिळतो आहे आणि यापूर्वी समुद्रात ओतल्या जाणाऱ्या तेलाचा पुनर्वापरदेखील होत आहे. समुद्रात होणारे प्रदूषण टाळले जाते आहे. याविषयी 'जीआयपीई'च्या 'सेंटर फॉर सस्टेनेबल डव्हल्पमेंट' चे प्रमुख गुरुदास नूलकर सांगितले की, "महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या नियमांनुसार आम्ही वंगण तेल गोळा करणारी संकलन केंद्र तयार केली आहेत. पुनर्वापर करून तयार झालेले तेल हे बॉयलर इंधन आणि इतर लुब्रिकेशन उद्देशांमध्ये वापरण्यात येते. हा प्रकल्प महाराष्ट्रातील इतर किनारी जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मत्स्यव्यवसाय विभागाशीदेखील यासाठी संपर्क साधणार आहोत."
मुंबई तरुण भारत ११.१.२५