रसायनशास्त्र

SV    24-Jan-2025
Total Views |
 
        रसायनशास्त्र हे आयुर्वेदाइतकेच जरी प्राचीन असले तरी त्यांचे काही प्रत्यक्ष पुरावे आता उत्खननात सापडले आहेत. इ.स.पू. २५०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या मोहेंजोदडो आणि हडप्पा म्हणजेच सिंधू   संस्कृती संबंधित उत्खननात घरे आणि कंपाउंडच्या भिंती बांधण्यासाठी चक्क जिप्सम सिमेंटचा आणि भाजलेल्या विटांचा वापर केला गेला असल्याचे आढळून आले. तसे मंजिष्ठेपासून तयार केलेल्या रंगाने रंगविलेल्या टेराकोटाच्या वस्तू देखील मिळाल्या आहेत. काचेचं  (ग्लास) वर्णन रामायणातही वाचायला मिळते. यानंतरच्या काळातील उत्कृष्ट काचेचे तुकडे मस्की (दक्षिण भारतात), हस्तिनापूर आणि तक्षशिला येथे सापडले आहेत. तसेच                       इ.स.पू. ६०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अजंठा    आणि वेरुळ येथील  लेण्यांमधील मूर्ती ज्या अनेक न विटणाऱ्या रंगांनी रंगविल्या आहेत हे सगळे पाहता विविध रासायनिक पदार्थ हजारो वर्षांपासून भारतात वापरले जात होते, हे स्पष्ट होते.
       प्राचीन काळातील अनेक देवालये, किल्ले, महाल आणि राजवाडे आजही मुसळधार पाऊस, भूकंप, प्रखर ऊन, महापूर आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत टिकून आहेत. त्यांच्या बांधकामात मळलेला चुना, सिमेंट वगैरे वापरले गेले आहे. धातूंचे दोन भाग जोडण्यासाठी (वेल्डिंग) 'वज्रसंघट' वापरले जायचे, यासाठी आठ भाग शिसे, दोन भाग घंटा-संमिश्र (बेल मेटल) आणि एक भाग पितळ यांचे मिश्रण करून हे वज्रसंघट बनवले जायचे. मुळात धातूपासून बनविलेला नसतानाही, अशोक स्तंभ हा धातूने बनविलेला वाटतो, यांचे कारण त्याच्या पृष्ठभागावर या 'वज्रसंघटा'चा दिलेला लेप, हे आहे.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत वस्त्रोद्योगात भारत अग्रेसर होता. याचे महत्वाचे कारण म्हणजे रंजक (Dyes) आणि शाई या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीयांच्या बरोबरीने जगात कोणीच नव्हते. आधुनिक रसायनशास्त्रात ज्या विविध शाखा आज आपण अभ्यासतो, त्यांपैकी अनेक शाखांचा प्राचीन काळापासून भारतात विकास झाला      होता. पण अगदी २०  व्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत, संपूर्ण   जग रसायनशास्त्रातील भारताच्या या दैदिप्यमान इतिहासाविषयी अनभिज्ञ होते किंवा युरोपियन लोकांनी हेतुपुरस्सर तो इतिहास दडवून ठेवला असावा.
       'फादर ऑफ इंडियन केमिस्ट्री' असे ज्यांना ओळखले जाते त्या डॉ. प्रफुल्लचंद्र रॉय यांनी  'द हिस्ट्री ऑफ इंडियन केमिस्ट्री' हा ग्रंथ लिहून तो इतिहास जगासमोर आणला.

प्राचीन भारतातील विज्ञानयुग – सतीश कुलकर्णी