बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवरील होणारे अन्याय, अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. त्यातच भिवंडीत अवैधपणे घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस येत आहे. झोपडपट्टी भागात ही संख्या सर्वाधिक आहे. इतकी वर्षे झोपेचे पेंग सरकारी यंत्रणेने घेतल्याने घुसखोरांची संख्या वाढतच आहे; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात बांगलादेशी घुसखोराविरोधात मोहीम तीव्र झाली आहे. त्यानंतर भिवंडी पोलिसही खडबडून जागे झाले आहेत.
दलालांच्या मदतीने घुसखोरी
आर्थिक टंचाई, अशिक्षितपणा व प्रचंड बेरोजगारी यामुळे बांगलादेशातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून भारतात गैरमार्गान घुसखोरी करत आहेत. भारतात प्रवेश करण्यासाठी या नागरिकांनी पारपत्र व परवाना, तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे; मात्र या सर्व शासकीय नियमांना बगल देत केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या व अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात आणि याच दलालांच्या मदतीने पुढे भारतातील विविध कानाकोपऱ्यात वास्तव्य करतात. कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील मुस्लिमबहुल भागांसह दाटीवाटी असलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये देखील राहतात.
पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये भिवंडी पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत २३ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे.
भिवंडीत अवैध राहत असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला पाच ते सात हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच दलाल त्यांना भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर बोगस शासकीय कागदपत्रे तयार करून देतात, तर बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तरुणींकडून १० ते १५ हजार है दलाल घेतात.
३१/१२/२४ सकाळ