सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम ( एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून नाशिकच्या संकुलात हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्राचा आणखी एक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे.
मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत विद्यापीठाने नुकताच ‘टेम्पल कनेक्ट’ सह करार केला. त्याअंतर्गत सहा महिन्यांचा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वर्षभराचा डिप्लोमा अभ्यासक्रम आणि दोन वर्षाचा पूर्णवेळ एमबीए अभ्यासक्रम सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठात तसेच वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षात सुरू झाला. आगामी काळात साधारण २० शैक्षणिक संस्थामध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे.
हा अभ्यासक्रम मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रगती करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनात विद्यार्थ्यांना नवे काम करता येणार आहे.
म.टा २४.१.२५.