बारपेटा (आसाम)- तुरुंग म्हटले की डोळ्यांसमोर येतात उंच भिंती, कडक पहारा, त्यात शिक्षा भोगणारे कैदी. आसाममधील बारपेटा तुरुंगही पहिल्या नजरेत इतर तुरुंगांसारखाच दिसतो, मात्र तुरंगाच्या आवारात डोलणाऱ्या अनेक प्रकारच्या पिकांमुळे तो जणू कृषी केंद्रच बनला आहे. तुरुंगातील कैदी वेगवेगळ्या प्रकारची पिके पिकवत आहेत.
लोअर आसाममध्ये असलेल्या या तुरुंगाच्या परिसरातील शेतात मोहरीसह फळबागा, भाजीपाला आणि छोटेशी मधमाशी पालनाचेही छोटे फार्मही आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बेरीसारखी दुर्मीळ पिकेही आहेत. तुरुंगातील कैदी शेतीशी संबंधित सर्व प्रकारची कामे करत असल्याने तुरुंगवास संपल्यानंतर उर्वरित आयुष्यासाठी नवीन कौशल्ये शिकण्यासही याची मदत होणार आहे.
जिल्हा तुरुंगाचे अधीक्षक प्रांजलकुमार शर्मा म्हणाले, "वर्षभरापूर्वी माझी आणि तुरुंगाधिकारी यांची एकाचवेळी इथे बदली झाली. त्या वेळी या तुरुंगात केवळ भातशेती केली जात होती. आम्ही वर्षभरात संपूर्ण जमीन वापरण्यासाठी बहुपीक शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या काळात या शेतीतून एक लाखांपेक्षा अधिक रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे. महसुलाव्यतिरिक्त तुरुंगात वर्षभर शेतीचे प्रयोग करण्यामागे दुसराही हेतू होता. तुरुंगातील कैदी ठोठावलेली शिक्षा व स्वतःच्या घरापासून दूर राहावे लागत असल्याने नेहमी मानसिक तणावात असतात. त्यामुळे त्यांना शेतीसारख्या उत्पादनक्षम कामात गुंतवून त्यांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. शेतात काम करताना ते हास्यविनोद करतात. कृषी उत्पादने पूर्ण सेंद्रिय असून कीटकनाशकांचा किंवा खतांचा वापर केला नाही." तुरुंगाधिकारी निलोत्पल काकटी म्हणाले, “स्थानिक विक्रेते या भाजीपाल्याची खरेदी करत असून कैद्यांसाठीही एक हजार किलो भाजीपाला वापरण्यात आला, भेंडी, मोहरी, आले, कोबीचा समावेश आहे.”
सकाळ २५.१.२५