महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे संत्रा, मोसंबी व कागदी लिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीत भारतात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. व्यापारीदृष्ट्या महत्व असलेल्या लिंबूवर्गीय फळझाडात लिंबू, संत्रा व मोसंबी याचा समावेश होतो. फळात काढणीपश्चात नासाडी, नुकसानीचे प्रमाण संत्र्यात २०-४० टक्के तर लिंबू व मोसंबीत १०-२५ टक्के आहे. काढणीपश्चात फळाची अयोग्य हाताळणी, योग्य साठवण पद्धतीचा अभाव, वाहतुकीत होणारा विलंब, योग्य वितरण व विक्रीव्यवस्थेचा अभाव तसेच प्रक्रियामुक्त पदार्थाची नगण्य निर्मिती यामुळे लिंबूवर्गीय फळाचे काढणीपश्चात नुकसान होते. दरवर्षी होणाऱ्या फळांच्या नासाडीमुळे आपल्या देशाचे आर्थिक नुकसान होते.
नासाडीचे महत्वाचे कारण म्हणजे काढणीनंतर फळे चुकीच्या पद्धतीने हाताळली जातात. अयोग्य पद्धतीने काढणी, अयोग्य हाताळणी, पॅकिंगचा अभाव, वाहतुकीला होणारा विलंब, चुकीच्या पद्धतीने केली जाणारी साठवण किंवा योग्य साठवणीच्या सोयीचा अभाव आणि योग्य वितरण व्यवस्थेअभावी फळांची नासाडी होते. लिंबूवर्गीय फळे नासाडीचे कारण म्हणजे भौतिक बदल, चिरडणे, फुटणे, खरचटणे, दबणे, जैविक आणि रासायनिक बदल इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. फळांची शात्रोक्त पद्धतीने काढणी, शेतावरील हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, साठवणी, वाहतूक प्रक्रिया व निर्यात इत्यादींनी होणारी नासाडी आपल्याला कमी करता येणे शक्य आहे.
कृषि पणन मित्र- नोव्हेंबर २०२४