टोपलीभर गहू

SV    09-Jan-2025
Total Views |
 
 एका शेटजींनी जन्मभर स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प केला आणि तो पाळला. रोज एका सत्पुरुषाचे कीर्तन-प्रवचन ऐकायचे असाही संकल्प त्यांनी केला होता. एक दिवस एका संत पुरुषांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्यांच्याजवळ जाऊन शेटजींनी नमस्कार केला आणि त्यांना म्हणाले, “महाराज, माझ्या सात पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती मी कमावून ठेवली आहे. पण तरी आठव्या पिढीची मला काळजी वाटते, त्यांचं कसं होईल?” महाराज हसले आणि म्हणाले “उद्या सकाळी माझ्याकडे या. तुमच्या सगळ्या काळज्या दूर होतील.”
ठरल्याप्रमाणे सकाळी शेटजी महाराजांकडे गेल्यावर महाराज त्यांना म्हणाले, “समोर मंदिराजवळ एक झोपडी आहे. तिथे एक गरीब परिवार राहतो. एक टोपलीभर गहू त्यांना नेऊन द्या. तिथून आलात की आठव्या पिढीबद्दल वाटणारी चिंता दूर कशी करायची हे मी तुम्हाला सांगेन.” शेठजी गहू घेऊन त्या झोपडीजवळ पोचले.
बाहेर एक आजीबाई बसल्या होत्या. शेटजींनी त्यांना दिलेले गहू त्यांनी घेतले नाहीत. त्या म्हणाल्या, “आमची आजची गरज भागली आहे”
शेटजी म्हणाले, “उद्यासाठी ठेवून घ्या.”
त्या म्हणाल्या, “उद्याचे उद्या बघू. ज्याने आज आमची काळजी घेतली तो उद्याही घेईल. आणखी गरजवंत जे असतील त्यांना हे गहू द्या”
हे ऐकून शेटजी थक्क झाले. त्यांना स्वत:च्या लोभी विचारांची लाज वाटली. त्या समाधानी वृद्धेला नमस्कार करून ते तिथून निघाले. आठव्या पिढीचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला.
तात्पर्य - मनुष्याने वर्तमानकाळात जगावे, भविष्यकाळासाठी आवश्यक तितकी तरतूद करावी. भविष्यकाळाची अनावश्यक काळजी करीत बसलात तर वर्तमानकाळात आनंदाने जगता येणार नाही.
पांचजन्य ३-१० नोव्हेंबर २४