महिला गटांच्या उत्पादनास जागतिक बाजारपेठ
SV 01-Feb-2025
Total Views |
महिला बचत गटांच्या उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनास चालना मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीस ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यामध्ये उमेद मार्ट- ई प्लॅटफॉर्म हे ॲप सुरू करण्यात आले असून, आता बचत गटांच्या उत्पादनांना जगभरातील बाजारपेठेत मागणी होत आहे.
राज्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आर्थिक सक्षम होणे, उदरनिर्वाह चालवण्यासाठी बचत गटातील महिलांना या उपक्रमांचा फायदा होत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून उमेदच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गटांच्या महिला जे उत्पादन अतिशय उत्तम दर्जाचे असते. मात्र, बाजारपेठ मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी शासनाने या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन ॲप विकसित केले आहे. त्यामुळे आता या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होणार आहे. दरम्यान, सातारा, जावळी, खंडाळा व फलटण या ठिकाणी बचत बाजार सुरू झाले आहेत.
पापड, लोणचे या पदार्थांसह विविध प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचे उद्योग-व्यवसाय केले जात असून, त्याची विक्रीही केली जात आहे. त्यामुळे महिला गटांच्या वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने आठवडी बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे संबंधित गाव व परिसरातील नागरिकांचा बचत गट महिलांच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सकाळ २४.१२.२ ४