भाजीपाला पिकांच्या काढणीसाठी गृहीत धरलेली परिपक्वता ही कोणत्या हेतूसाठी भाजी काढणी केली जात आहे यावर अवलंबून असते. म्हणजे पिकांची काढणी स्थानिक बाजारपेठेसाठी , दूरच्या बाजारपेठेसाठी वा प्रक्रिया उद्योगासाठी वेगवेगळ्या परिपक्वतेला करावी लागते.
टोमॅटोः दूरच्या बाजारपेठेसाठी पिकण्यास सुरुवात झालेल्या फळांची काढणी करावी व स्थानिक बाजारपेठेसाठी पूर्ण पिकलेली फळे व प्रक्रियेसाठी झाडावर पूर्ण पिकलेली किंचित मऊ पडलेली फळे काढावी.
वांगी : साधाणतः १०-१२ आठवड्यांनी फळे काढणीसाठी तयार होतात. पूर्ण वाढलेली परंतु कोवळी, आकर्षक, चमकदार फळे काढावीत. फळांचा रंग आकर्षक नसल्यास ती फळे जास्त पक्व झाली आहे, असे समजावे. अशा फळांना बाजारात मागणी नसते.
मिरचीः लागवडीपासून ४०-५० दिवसांनी हिरव्या फळांची तोडणी करण्यास सुरुवात होते. मिरच्या वाळवून साठवायच्या असतील तर ७०-८० दिवसांनी रंग लाल झाल्यानंतर तोडायला सुरूवात करावी.
कांदा व लसूणः पाने करपण्यास सुरवात झाली किंवा ५०-६०% माना पडल्यानंतर काढणीस सुरवात करावी.
भेंडीः निर्यातीसाठी आकर्षक हिरव्या रंगाची, कोवळी, लुसलुशीत, ६-९ सें.मी. लांबीची फळे एक दिवसाआड काढावी.
कोबीवर्गीय भाजीपालाः कोबी पिकाचा आकर्षक हिरव्या रंगाचा, घट्ट गड्डा काढावा.
फुलकोबीः योग्य आकाराचा, आकर्षक पांढऱ्या रंगाचा गड्डा काढावा. काढणीस उशीर झाल्यास गड्डा पिवळसर होऊन त्याचा आकर्षकपणा नाहीसा होतो.
वेलवर्गीय भाजीपाला: यामध्ये काकडी, भोपळा, कारली, दोडके, गिलके इ. समावेश होतो. या पिकांची पूर्ण वाढ झालेली परंतु कोवळी, आकर्षक फळे काढावी. काढणीस उशीर झाल्यास फळांचा आकर्षकपणा नाहीसा होऊन चांगली चव लागत नाही. तसेच बाजारभाव पण कमी मिळतो.
शेंगवर्गीय भाजीपालाः यामध्ये वाल, घेवडा, वाटाणा, चवळी, गवार इ.चा समावेश होतो. या सर्व पिकांची पूर्ण वाढ झालेली परंतु कोवळी फळे काढावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगांची प्रत खालावते.
पालेभाज्या: यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक इ.समावेश होतो. या पालेभाज्या लागवडीनंतर हंगामनिहाय, जातीपरत्वे ४०-५० दिवसात काढणीसाठी तयार होतात. या पालेभाज्यांची आकर्षक हिरव्या रंगाची, कोवळी पाने असताना काढणी करावी.
कृषी पणन मित्र, फेब्रुवारी २५