भाजीपाला पिकाची काढणी - भाग २

SV    12-Feb-2025
Total Views |
 

भाजीपाल्याची हाताळणी

                कापणी केल्यानंतर गुणवत्ता सुधारता येत नाही, ती फक्त टिकवता येते; म्हणूनच फळे, भाज्या आणि फुलांची योग्य अवस्था, आकार आणि सर्वोत्तम गुणवत्तेवर काढणी करणे महत्त्वाचे आहे. अपक्व किंवा अति पिकलेल्या उत्पादनाची काढणी केल्यास ते साठवणुकीत जास्त काळ टिकू शकत नाही. भाजीपाला नासाडी रोखण्यासाठी शीतकरण प्रभावी ठरवायचे असल्यास, शीतगृहातील तापमान शक्य तितके स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे. 
               शीत आणि उबदार तापमानाचा एकत्रित परिणाम उत्पादनांच्या पृष्ठभागावर ओलावा जमा होण्यास (घाम येणे) कारणीभूत ठरू शकतो, ज्यामुळे नाश लवकर होण्याची शक्यता असते. साठवण खोल्या नीट संरक्षित आणि पुरेशा प्रमाणात थंड असाव्यात, तसेच तापमानातील बदल टाळण्यासाठी योग्य हवेचा प्रवाह राखला पाहिजे. थर्मामीटर, थर्मोस्टॅट आणि हाताने नियंत्रित तापमान यंत्रे उच्च दर्जाची असावीत, तसेच त्यांची अचूकता नियमितपणे तपासावी. 
               काढणी हाताने करतो की यंत्राने याचा फार मोठा परिणाम भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर होतो. भाजीपाला यंत्राने काढणी केल्यास, कापणे, ब्रशिंग करणे यांसारख्या क्रियेमध्ये भाजीपाल्याला जखमा होतात. त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता अधिक होते. बहुतेक फळे व भाजीपाला तसेच सर्व फुले यांची काढणी हातानेच केली जाते. कंदवर्गीय भाजीपाला जसे की कांदा, बटाटा, रताळे यांची काढणी यंत्राने केली जाते. काढणीच्या वेळी शक्यतो प्लास्टिक क्रेटचा वापर करावा आणि काढणीनंतर भाज्या सावलीत ठेवाव्यात तापलेल्या जमिनीवर किंवा उन्हात ठेवू नयेत. अन्यथा त्याचे बाष्पीभवन होऊन त्या साठवणुकीमध्ये लवकर खराब होतात.

कृषी पणन मित्रफेब्रुवारी २५