अलीगड मुस्लिम विद्यापीठात बीफ बिर्याणीवरून वाद

SV    13-Feb-2025
Total Views |
 
        अलीगड  : उत्तर प्रदेशातील  अलीगड   मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) सर शाह सुलेमान हॉलमध्ये रविवारी दुपारच्या जेवणात बीफ बिर्याणी दिली जाणार असल्याचे एका नोटीसमध्ये नमूद केल्याने वाद निर्माण झाला. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावे लागले.नोटिशीनुसार विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वाद वाढल्यानंतर AMU प्रशासनाने ही एक टायपिंगची चूक असल्याचे स्पष्ट केले आणि संबंधित जबाबदार व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले.
        हा वाद सुरू झाल्यानंतर भाजप नेते आणि AMUचे माजी विद्यार्थी डॉ. निशित शर्मा यांनी विद्यापीठ प्रशासनावर तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, विद्यापीठ प्रशासन अशा कट्टरवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहे. वरिष्ठ अन्न समितीच्या जबाबदारीत हलगर्जीपणा दाखवण्यात आला आहे.
        दुसरीकडे, विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाच्या सदस्य प्रा. विभा शर्मा यांनी सांगितले की, ही नोटीस एका टायपिंगच्या चुकीमुळे प्रसिद्ध झाली होती. त्यावर कोणतेही अधिकृत स्वाक्षरी नव्हते, त्यामुळे तिची विश्वासार्हता संशयास्पद होती. प्रशासनाने त्वरित कारवाई करत दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून विद्यापीठ नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. तसेच मेन्यूमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
       अलिगड मुस्लिम विद्यापीठात दुपारच्या जेवणात 'बीफ बिर्याणी' देण्याच्या नोटीसमुळे वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी दोन विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या मुख्य प्राध्यापिकेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महंमद फैझुल्लाह आणि मुजस्सीम अहमद या विद्यार्थ्यांसह अधिष्ठाता एफ. आर. गौहर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणी सेनेने या संदर्भात निवेदन दिले आहे.

न्यूज १८ मराठी