सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतीसंबंधी सर्व महत्त्वाची माहिती डिजिटल स्वरूपात राहील. म्हणजे, शेतजमिनीच्या नोंदी, पीकपद्धती, अनुदानाची नोंद यामध्ये पारदर्शकता येईल आणि गैरव्यवहार टाळले जातील. खऱ्या अर्थाने 'स्मार्ट इंडिया'चा स्मार्ट शेतकरी होण्याकडे वाटचाल होणार आहे. डिजिटल कृषी विकास हा फक्त एका योजनेपुरता मर्यादित नाही, तर ती अखंड चालणारी प्रक्रिया आहे. भविष्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल. या मिशनच्या अंतर्गत भारताचा शेतकरी जागतिक स्तरावर नक्कीच स्पर्धात्मक होईल यात शंका नाही.
काही वर्षांपूर्वी 'डिजिटल इंडिया' या भूलथापा असून, हे काही भारतात शक्य होणार नाही, असे सांगणाऱ्या विरोधकांचे देशातील डिजिटल क्रांतीने डोळे दिपले गेले आहेत. एकेकाळी या 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमाची खिल्ली चिदंबरम यांच्या सारख्या नेत्यांनीदेखील उडवली होती. मात्र, आज 'डिजिटल इंडिया'चा प्रभाव सर्वच क्षेत्रात जाणंवू लागला आहे. आज डिजिटल क्रांतीमुळे शेतीही आधुनिक आणि सक्षम होत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा पर्यायाने शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढत आहे. हे बदल म्हणजे फक्त विकासाची सुरुवात असून, 'आत्मनिर्भर भारता'च्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे !
मुंबई तरुण भारत १५.२.२५