पुणे : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत आतापर्यंत २१०० कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या योजनेत आतापर्यंत २१ हजार १४९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यात महिला उद्योजिकांच्या प्रकल्पांची संख्या सुमारे १२ हजार आहे. हे प्रमाण तब्बल ५७ टक्के इतके आहे. कृषी विभागाने महिलांच्या सुमारे साडेआठ हजार प्रकल्पांना आतापर्यंत १५५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. राज्यात सर्वाधिक १ हजार ८८२ उद्योग संभाजीनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकार कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून अर्थसहाय देत असते. यात प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा दहा लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. राज्यात २०२१ पासून ही योजना राबविण्यात येते. त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो, प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.
अनुदानातील ८ हजार ४७६ प्रकल्प महिला संचलित आहे. त्यांना १५५ कोटी रुपये ४९५ अनुदानापोटी देण्यात आले आहेत. तर ३ हजार ५१९ प्रकल्प मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. कृषी प्रक्रिया उद्योगात महिलांची संख्या वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. जानेवारी अखेर २७६ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले.
लोकमत १९/०२/२५