दहशतवादावर पाकिस्तानने बोलणे हाच मोठा विनोद - भारतीय राजदूत

SV    21-Feb-2025
Total Views |
 
      हेग: जैश ए महंमद सारख्या गटांकडून पाकिस्तान घडवत असलेल्या दहशतवादी कृत्यांचा भारत बळी आहे. जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तान आहे आणि तेच आता या संकटाचा सामना करण्याचा दावा करतात, हाच एक विनोद आहे, असा घणाघाती हल्ला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताच्या राजदूतांनी चढवला. बहुपर्यायांचा सराव, जागतिक प्रशासनाची फेरमांडणी आणि सुधारणा या विषयावरील चर्चा सत्रात पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री महंमद इशाक दर यांनी काश्मीर मुद्दद्याचा उल्लेख केला. त्यावर भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत पर्वथानी हरीश यांनी जोरदार पलटवार केला. 
       पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या यादीतील २०  पेक्षा अधिक दहशतवादी संघटना तेथे कार्यरत आहेत. सीमेपलीकडे दहशतवाद करण्यास सरकारकडून पाठिंबा दिला जात असल्याचे सांगून हरीश म्हणाले, त्यानंतर दहशतवादाविरोधात आघाडीवर येण्याची भाषा पाकिस्तान करत असेल तर एक मोठा विनोद आहे. जैश ए महंमद आणि हरकत उल मुजाहिद्दीनसारख्या आणखी डझनभर संघटनांच्या दहशतवादी कृत्यांचा भारत बळी आहे, संयुक्त राष्ट्रांच्या अल कायदा निर्बंध समितीने अनेक पाकिस्तानी दहशतवादी संघटना आणि व्यक्तीच्या मालमत्ता गोठवण्याची, शस्त्रे काढून घेण्याची शिफारस केली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
     दहशतवादाचा कोणताही प्रकार, स्वरूप अथवा उद्देशाचे समर्थन होऊ शकत नाही. निष्पाप नागरिकांविरोधात दहशतवादी रचत असलेल्या कटाचे कोणतेही समर्थन असू शकत नाही. चांगला आणि वाईट असा दहशतवादात कोणी फरक करू शकत नाही. दर यांनी याची नोंद घेऊन परिषदेचा वेळ वाया घालवू नये, असा सल्ला हरीश यांनी दिला.
काश्मीर भारताचेच !
काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे आणि राहील. याउलट काश्मीरच्या काही भागांवर पाकिस्तानने बेकायदा कब्जा केलेला आहे. पाकिस्तानच्या खोट्या आणि फसव्या प्रचार मोहिमेने या वस्तुस्थितीत कोणताही बदल होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

पुढारी २०.२.२५