देऊर (धुळे): सातत्याने उद्भवणारा दुष्काळ, पाण्याची टंचाई, बियाणे-खतांच्या वाढत्या किमती अन् एवढे करूनही शेतीमालाला मिळणारा मातीमोल दर यामुळे ग्रामीण भागातील युवकांचा शेतीकडील ओढा संपला. शेती म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थिती आहे. यामुळे जो-तो रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहे. याला मात्र नांद्रे (ता. धुळे) येथील प्रांजली किशोर बोरसे अपवाद ठरली असून, शहरातील सुखी जीवन सोडून ती चक्क शेतीत रमली आहे. विशेष म्हणजे ती नैसर्गिक शेतीतून विविध प्रयोग करत आहे.
प्रांजलीचे वडील किशोर बोरसे नायब तहसीलदार म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. यामुळे लहानपणापासून पुण्यातच वास्तव्य असलेल्या प्रांजलीचे शिक्षण पुण्यात झाले. पुण्यातील निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत आठवीत असताना "मोठे झाल्यावर काय होणार असे शिक्षकांनी विचारल्यावर प्रांजलीने स्पष्टपणे "मी शेतकरी होणार' असे सांगितले होते. प्राथमिक शिक्षणापासूनच शेतीशी संबंधित नवनवीन प्रयोग व माहिती जाणून घेण्याची तिला जिज्ञासा होती. या जिज्ञासेतूनच तिने आपली वाटचाल सुरू करताना बारावीनंतर पुण्यातच कृषिविषयक पदवी अभ्यासक्रमाला (बीएस्सी ऍग्री) प्रवेश घेतला. २०११ मध्ये पदवी परीक्षेत तिने पुणे महाविद्यालयातून प्रथम, तर राहुरी कृषी विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकावत शेतीतील आपली आवड किती मोठी आहे, याची प्रचिती दिली.
आई-वडिलांचे पाठबळ
पदवीनंतर अनेक चांगल्या नोकऱ्यांची संधी असताना प्रांजलीने थेट आपल्या मूळ गावी म्हणजे नांद्रे (ता. धुळे) येथे स्वतःची शेती नैसर्गिकपणे करण्याचा ध्यास घेतला. यासाठी तिने एक वर्ष बंगळूर येथे नारायण रेड्डी यांच्याकडे नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षणही घेतले. २०१३ मध्ये ती नांद्रेत दाखल झाली. तेव्हापासून प्रांजली आपल्या दोन एकर शेतीत नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहे. प्रांजलीच्या या निर्णयाला आई रत्नाबाई व वडील किशोर बोरसे यांनीही पाठिंबा दिला. निवृत्तीनंतर तिचे आई-वडीलही शेतात वास्तव्यास आले आहेत.
शाश्वत शेती उत्पादनांची विक्री
प्रांजली तीन टप्प्यांत नैसर्गिक शेती करत आहे. यात पहिल्या टप्प्यात अन्नधान्यातून स्वावलंबन या सूत्रानुसार सुरवात झाली. दुसऱ्या टप्प्यात अर्थार्जनाचे काम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात संशोधन केले जात आहे. तिने "यज्ञांग' या ब्रँडद्वारे शेती उत्पादनांची मोठ्या शहरांतील बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे. यात अंबाडीपासून कॉफी, चटणी, सरबत, मेतकूट बनविणे, लोणचे बनविणे, याशिवाय गहू, बाजरी, शेंगा, हरभरा, मोहरी, करडई, जवस, मसूर, दादर, हातग्याच्या फुले आदींची पुणे, मुंबई आदी शहरांत विक्री केली जात आहे.
सकाळ