बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा दिल्लीला ताप

SV    05-Feb-2025
Total Views |
 

बांगलादेश आणि म्यानमारमधून दिल्लीत येणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरांमुळे मुस्लीम लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसराची (एनसीआर) राजकीय-सामाजिक-आर्थिक रचना बदलली आहे, असे 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठा'च्या (जेनएयू) अहवालातून समोर आले आहे.

‘दिल्लीतील बेकायदेशीर स्थलांतरित : सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिणामांचे विश्लेषण' असे या अहवालाचे नाव आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या या प्रवाहामुळे शहराची लोकसंख्या कशी बदलली आहे, तसेच त्याची अर्थव्यवस्था कशी विस्कळीत झाली आहे, संसाधनांवर ताण आला आहे आणि गुन्हेगारी जाळेदेखील मजबूत झाले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना देण्यात येणाऱ्या राजकीय संरक्षणामुळे, ज्यामध्ये मतदारनोंदणीची सोयदेखील समाविष्ट आहे, निवडणूक हाताळणी आणि लोकशाही अखंडतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे, बेकायदेशीर स्थलांतरामुळे सार्वजनिक आरोग्य संकटांचा धोका वाढला आहे, कारण स्थलांतरित वस्त्त्यांमधील गर्दी आणि अस्वच्छ राहणीमान संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराला कारणीभूत ठरते, असेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.


मुंबई तरुण भारत ४.२.२५