पाकिस्तानी नागरिकांची जगभरात घुसखोरी!

SV    05-Feb-2025
Total Views |
 
            काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. एक छोटीशी बोट, त्यात ऐंशीपेक्षा जास्त प्रवासी कोंबलेले होते. प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बोट पश्चिम आफ्रिकेहून स्पेनला जात होती. अटलांटिक महासागरात मोरोक्कोजवळ ही बोट उलटली आणि त्यात पन्नासपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. बोटीला जलसमाधी मिळाल्यानंतर ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यात बहुतांश म्हणजे ४४ प्रवासी पाकिस्तानचे होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ज्या प्रवाशांना वाचवण्यात आलं, जे प्रवासी वाचले तेही बहुतकरून पाकिस्तानीच होते. ही घटना विशेष यासाठी की हे सारेच प्रवासी अवैधरीत्या युरोपमध्ये घुसत होते. काहीही करून युरोपात प्रवेश करणं हेच अशा लोकांचं अंतिम ध्येय असतं.
           पाकिस्तानी लोक आखातात आणि युरोपात का जातात, त्याचंही महत्त्वाचं कारण आहे. पाकिस्तानच्या जन्मापासूनच त्यांची स्थिती कशी आहे, ते अख्ख्या जगाला आणि त्याहीपेक्षा त्यांच्या जनतेला खूपच चांगली माहीत आहे. दिवसेंदिवस तिथली परिस्थिती आणखीच बिघडते आहे. लोकांना अक्षरशः भीक मागून, गाढवं विकून जगावं लागतं आहे. पाकिस्तानात अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. काहीही करून या जन्मजात दारिद्र्यातून आपली सुटका व्हावी, असं त्यांना वाटत असतं. आपल्याच देशात राहिलो, तर असेच सडत राहू हेही त्यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे वैध मार्गानं म्हणा किंवा अवैध मार्गानं, दुसऱ्या देशात सटकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक पाकिस्तानी तर अरब देशांत अवैध मार्गानं घुसून तिथे भीक मागण्याचं काम करतात. पाकिस्तानात मरमर काम करूनही दोन वेळा पोट भरण्याचीही त्यांना भ्रांत असते; पण अरब देशांत भीक मागून त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसे ते कमावतात, पण त्यामुळे अनेक अरब देशांनी पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशांतून हाकलून द्यायला सुरुवात केली आहे. तसाच हा दुसरा प्रकार म्हणजे येनकेन प्रकारे युरोपात घुसण्याचा आणि एकदा का तिथे घुसलं की मग 'दादागिरी' करण्याचा. त्यामुळे युरोपही अवैधरीत्या तिथे घुसणाऱ्या नागरिकांना कंटाळलं आहे. 
        युरोपात शिरण्याचा त्यातल्या त्यात सोपा मार्ग म्हणजे समुद्रमार्गे तिथे घुसखोरी करणं, याच प्रयत्नांत अनेक पाकिस्तानी नागरिकांना जीवही गमवावा लागतो.
         चांगले आयुष्य जगण्याच्या शोधात दरवर्षी अक्षरशः हजारों, लाखो पाकिस्तानी जगभरात, विशेषतः युरोपात जाण्याचा प्रयत्न करतात, विविध देशांत वैध, अवैध मार्गाने प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसंबंधी अभ्यास करणाऱ्या 'फ्रॉटेक्स' या एजन्सीचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी तब्बल अडीच लाखापेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक अधिकृत कागदपत्रांशिवाय युरोपात घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. याच विषयावर काम करणाऱ्या 'वॉकिंग बॉर्डर्स' या संस्थेचं तर म्हणणं आहे, अनेक पाकिस्तानी युरोपात घुसण्यासाठी आधी मॉरिटानिया आणि सेनेगल यासारख्या पश्चिम आफ्रिकी देशांत जातात आणि तिथून ते स्पेनमार्गे युरोपात घुसखोरी करतात, या प्रयत्नांत गेल्यावर्षी एकूण ११ हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यात अर्थातच पाकिस्तानी नागरिकांची संख्या सर्वाधिक होती.

लोकमत 28/01/25