बेळगाव: हर हर महादेव ही शिवकाळात मराठ्यांची मावळ्यांची युद्धघोषणा. तीच युद्धघोषणा आहे मराठा लाईट इन्फ्रंट्रीची. मराठ्यांनी मावळ्यांनी किल्ले कोंढाणा या दिवशी सर केल्याची आठवण म्हणून मराठा इन्फंट्री ४ फेब्रुवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करते. सन १६७० साली याच दिवशी तानाजी मालुसरे आणि शेलारमामांच्या पराक्रमाने हा गड मावळ्यांनी जिंकला होता. या घटनेला यंदा ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत.
हा किल्ला जिंकण्याचा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. कारण स्वराज्याच्या पूर्ण संघर्षात हे युद्ध अतिशय जोखमीचे आणि गाजलेले. त्यात तानाजी मालुसरे हे सेनापती कामी आले. ‘गड आला पण सिंह गेला’, ही खंत शिवरायांनी बोलून दाखवली ती हाच गड जिंकल्यानंतर. स्वतःच्या मुलाचे-रायबाचे लग्न सोडून तानाजी मालुसरे हा गड सर करण्यासाठी निघाले होते. तेव्हा त्यांनी उच्चारलेले शब्द होते, ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग आमच्या रायबाचे’
हिंदवी स्वराज्यासाठीच्या संघर्षातील या असीम पराक्रमाची आठवण म्हणून मराठा इन्फंट्री हा दिवस साजरा करते. त्यानिमित्त मंगळवारी मराठा इन्फंट्रीचे मुख्यालय असलेल्या बेळगावात विशेष कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
मराठा इन्फंट्री ही भारतीय सैन्यातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित रेजिमेंटपैकी एक. बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री हे तिचे पहिले नावे, कालांतराने ते मराठा इन्फंट्री आणि नंतर मराठा लाईट इन्फंट्री असे बदलण्यात आले. लाईट म्हणजे अतिचपळ, प्रतिमिनिट १८० पावले चालण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीची असल्याचे मानले जाते. ज्या चपळतेने हिंदवी स्वराज्यासाठी मावळे शत्रूवर हल्ले करत, तीच चपळता मराठा इन्फंट्रीच्या जवानांमध्ये बिंबवली जाते.
पुढारी ४.२.२५