हिंमत शाळा

SV    07-Mar-2025
Total Views |
 
 पुण्यालगत मुळशी तालुक्यातील दुर्गम खेडेगावांमध्ये एक संस्था गेली काही वर्षे ग्रामपरिवर्तनाचे काम करत. अंबडवेट या गावापासून हे काम सुरू झाले. गावागावात चांगल्या पद्धतीने शेती व्हावी, जलसंधारणाची कामे व्हावीत, मुलांनी शिक्षण घ्यावे, महिला स्वावलंबी व्हाव्यात ही आणि अशी विविध उद्दिष्टे ठेऊन 'राष्ट्रीय सर्वांगीण विकास संस्थे'ने हे काम सुरू केले. गेली अठ्ठावीस वर्षे हे काम सुरू आहे.
या संस्थेचे संस्थापक प्रा. अनिल व्यास हे मूळचे मुंबईचे; मुंबईतील खालसा महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमुळे ग्राम-विकासाचे काहीतरी काम करायचे अशी जिद्द बाळगून निवृत्तीनंतर ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात त्यांनी काम करायला सुरुवात केली. २०११ साली त्यांनी नापास मुलांसाठी शाळा सुरू केली.
शिक्षण अर्ध्यावरच सोडण्याचे प्रमाण ग्रामीण भागात खूप आहे. अशी अडनिड वयाची मुले अनेकदा गुन्हेगारीकडेही वळतात. अशा नापास झालेल्या, शाळा सोडलेल्या किशोरवयीन मुलांसाठी ही आगळीवेगळी शाळा चालते. या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचा चांगला अभ्यास घेऊन दहावीच्या परीक्षेत ती मुले उत्तीर्ण होतील, असा प्रयत्न केला जातो.
दहावीतील यशामुळे त्यांच्या आयुष्यात एक नवी उमेद निर्माण होते. नापास झाल्यामुळे या मुलांनी हिंमत सोडलेली असते. हिंमत सोडलेल्या मुलांना नवी उमेद देणारी शाळा म्हणून या शाळेचे नाव  'हिंमत शाळा' असे ठेवले आहे. मुळशी तालुक्याच्या बाहेरील आणि दुर्गम भागातील मुले           येथे निवासी असतात. सुरुवातीला प्रा. व्यास गावोगावी  प्रवास  करून मुलांचा शोध घेत असत. हे काम त्यांनी मोठ्या चिकाटीने केले. दरवर्षी किमान २५ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. त्यापैकी ८० टक्के विद्यार्थी यशस्वी होतात, असा अनुभव आहे.
 
– शैलेन्द्र बोरकर,  अध्यक्ष, सेवा भारती,  सकाळ १८.२.२४