विद्यार्थिनींकडून पुस्तकाची निर्मिती

SV    08-Mar-2025
Total Views |
           पुणे : शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांतून कविता अभ्यासताना विद्यार्थिनींनी कविता लिहिल्या. कला शिक्षकांनी याला चित्रांची जोड दिली अन् शाळेकडून 'काव्यकलिका' या पुस्तकाची निर्मिती झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कन्याशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या लेखनाला पुस्तकाचे रूप मिळाले आहे. २७फेब्रुवारी रोजी या बाललेखिकांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
                पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्याशाळेने हा उपक्रम हाती घेतला आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
                    या पुस्तकामध्ये चौथी ते सातवीमधील सुमारे ४० विद्यार्थिनींच्या 'आई', 'शाळा', 'मैत्री', 'शिक्षक', 'खेळ' अशा विषयांवरील कवितांचा समावेश आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले आणि कवयित्री समृद्धी सुर्वे यांनी या कवितांची निवड केली आहे. शाळेतील कलाशिक्षिका मुक्ता धोंगडे यांनी चित्रांची जोड देऊन पुस्तकाची सजावट केली आहे.
                   'शालेय वयात पुस्तकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. याच वयात वाचनासह लेखनाचीही गोडी लागल्यास विद्यार्थी अधिक समृद्ध होतात. विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण होण्यासह साहित्यनिर्मिती प्रक्रिया समजावी, या उद्देशाने 'काव्यकलिका' या पुस्तकाची निर्मिती केली. शाळेतील हा पहिलाच प्रयोग आहे,' अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांनी दिली.
                     'विद्यार्थिनींना लिहिते करण्यासाठी; तसेच कवितेची शैली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने शाळेने कार्यशाळांचेही आयोजन केले होते. यामध्ये भाषेपासून ते आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडण्याच्या शैलीपर्यंत विविध बारकाव्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले,' असे चौगुले यांनी नमूद केले.

महाराष्ट्र टाईम्स २७.२.२५