लेझीमची परंपरा जपत निर्माण केली रोजगाराची संधी

SV    09-Mar-2025
Total Views |
 

संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथील महिलांनी एकत्रित येत अतिशय उत्तम लेझीम खेळण्याची परंपरा जपली आहे. या माध्यमातून महिलांना खऱ्याअर्थानं रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे. आज या महिलांना लेझीम खेळण्यासाठी विविध ठिकाणांहून बोलावलं जातय. त्यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

चार महिने केला लेझीमचा सराव : शेतीत शाश्वत उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले. त्यामुळं गावातील महिलांनी एकत्रित येत काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. यानुसार त्यांनी बैठक घेतली आणि लुप्त होत चाललेल्या लेझीमला चांगले दिवस आणण्याचं ठरवलं. यानंतर महिलांनी श्री रोकडेश्वर लेझीम पथकाची स्थापना केली. या लेझीम पथकात एकूण तीस महिला आहेत. या महिला दिवसभर शेतात काम करायच्या आणि दररोज रात्री मंदिरासमोर लेझीम खेळण्याचा सराव करायच्या. जवळपास तीन ते चार महिने त्यांनी लेझीमचा चांगला सराव केला. यानंतर गावातील विविध कार्यक्रमांमध्ये महिलांनी लेझीम खेळण्यास सुरूवात केली.

रोजगाराची संधी : आज या महिला लेझीम खेळण्यासाठी पुणे जिल्ह्यासह विविध ठिकाणी जातात. लग्न, मिरवणूक वरात अशा कार्यक्रमांमध्ये लेझीम खेळण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून या सर्वजणी अतिशय उत्तमरीत्या लेझीम खेळत आहेत. या निमित्तानं महिलांना लेझीमच्या माध्यमातून रोजगाराची चांगली संधी निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय. विशेष बाब म्हणजे, सात हजार रुपयांपासून ते अकरा हजार रुपयांपर्यंत लेझीमची बिदागी मिळत असते. या माध्यमातून प्रत्येक महिलेला पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत एका कार्यक्रमाचे पैसे मिळत आहेत.

"आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यामुळं आम्हीदेखील शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून लेझीम खेळण्याचं ठरवलं आणि तीस महिलांनी एकत्रित येत लेझीम पथकाची स्थापना केली. आज आम्हाला ठिकठिकाणी लेझीम खेळण्यासाठी बोलवलं जातय. संगमनेर पंचायत समितीच्या उमेद अभियानांतर्गत आम्ही महिलांनी उत्तुंग भरारी घेतलीय," अशी प्रतिक्रिया लेझीम पथकातील एका महिलेनं दिली.

ईटीव्ही भारत ०७/०२/२५