संस्कृती उदयाला येणे आणि लयाला जाणे यात खूप मोठा काळाचा पट असतो. त्यात इतिहास घडतो, भूगोल बदलतो, मानवी जीवनात स्थित्यंतरे होतात, नवे शोध लागतात, जुन्या धारणा मागे पडतात. हा काळ लेखणीत पकडायचा तर ते मोठे आव्हानच! ‘लँड ऑफ सेव्हन रिव्हर्स’ हे संजीव संन्याल यांचे मूळ इंग्रजी भाषेतले पुस्तक. संजीव जोशी यांनी त्याचा ‘सप्त सरितांचा प्रदेश’ असा अनुवाद केला आहे.
हे पुस्तक अनेक अर्थाने माहितीपूर्ण आहे. लेखकाने म्हटल्याप्रमाणे भारताच्या भूगोलाचा इतिहास तपासणे हा या पुस्तकाचा हेतू आहे. भारत ही संकल्पना, इथली प्राकृतिक वैशिष्ट्ये, इथले लोकजीवन, यात झालेली स्थित्यंतरे याबद्दल लिहिताना लेखक प्राचीन भारतीय संस्कृती, त्याकाळातली व्यापारी भरभराट, नद्या आणि त्याकाठाने फुललेली संस्कृती, शिलालेख, नाणी, ललितकलांचा उदय आणि प्रगती, त्यानंतर झालेले मोगल आक्रमण, त्यांचे क्रूर शासन, आठशे वर्षांच्या मोगल राजवटीचा अस्त आणि इंग्रजी राजवटीचा उदय, भारताचे स्वातंत्र्य, नवभारताची उभारणी असे एकामागोमाग होणारे संक्रमण वाचताना अनेक अपरिचित पैलू आपल्यासमोर येतात.
दिल्लीच्या राजस्तंभांपैकी एक लोहस्तंभ पंधराशे वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत उभा आहे. चंद्र नावाच्या राजाचा पराक्रम त्यावर कोरलेला आहे. विष्णूला समर्पित असा मजकूर त्यावर आहे. जयपूरच्या राजध्वजाच्या वरच्या बाजूला एक छोटासा ध्वज फडकताना दिसतो. ‘सवाई’ म्हणजे सव्वा हे बिरूद मिरवणारे ते प्रतीक आहे. अकबराचा मंडलिक सवाई जयसिंग राजा इतरांपेक्षा पराक्रमात वरचढ होता म्हणून अकबर त्याचा उल्लेख सवाई असा करायचा. तसेच नगररचना करताना एक नियम पाळला जायचा; तो म्हणजे शहराची लांबी रुंदीच्या सव्वापट असावी.धोलविरा आणि जयपूर या शहरांची रचना त्यानुसार आहे.
लोहयुगाच्या अखेरच्या काळात दगड मातीचे तट, माती भाजून विटा आणि लाकूड यांचा बांधकामातला वापर वाढला. गंगा नदीत तसेच समुद्रात प्रवास करू शकणारी जहाजे या काळात होती. बंगालच्या उपसागरापासून थेट श्रीलंकेपर्यंत सामुद्री व्यापार सुरू होता. महावीर जैन आणि गौतम बुध्द यांच्या तत्त्वज्ञानाचा उदय याच काळातला. भारतातला बौध्दिक विकास या काळात कळसावर होता.
शहरीकरणाला सुरुवात गंगेच्या काठाने झाली. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांची रचना या काळात झाली असे म्हणतात. महाभारतात एक लाख कडवी आहेत हे सांगताना कुरुक्षेत्रातल्या युध्दात भारतातल्या सगळ्या वंश, जातींनी भाग घेतला ही सामाजिक दृष्ट्या महत्वाची नोंद लेखक करून जातो. व्यापाऱ्यांचे युग, सिंहाचे युग, लुप्त नदीकाठचे लोक, सिंदबादपासून झेंग हे पर्यंत अशी उत्कंठावर्धक नावे या पुस्तकातल्या प्रकरणांना आहेत.
शेवटच्या भागात अर्थात आपल्याला आधुनिक भारताचे दर्शन घडते. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्या राजवटी, राजधानी म्हणून दिल्ली शहरात वेगवेगळ्या राजवटीत झालेले बदल, स्वातंत्र्यलढा आणि भारताच्या फाळणीचा इतिहास, त्यामुळे बदललेला भूगोल, स्थलांतरित लोकांची संस्कृती, नवसाक्षर आणि नवश्रीमंत पिढीचा भारताच्या क्षितिजावर झालेला उदय आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक पडसाद अशा व्यापक विषयांना लेखक स्पर्श करतो. म्हटले तर रंगीबिरंगी कोलाज; पण त्यातल्या प्रत्येक तुकड्याचा अनोखा रंग असा आपला बहुरंगी देश आणि त्याची तशीच ओळख नेमक्या शब्दात नेटकेपणाने इथे वाचायला मिळते. आवर्जून वाचावे असे पुस्तक.
Regards-:
Sanskrutik Vartapatra
C-1, Shalini Residency,
ICICI Bank Building, Gate-2
Hingane Budruk, Karvenagar,
Pune 411052
Maharashtra
Ph-:020-29952037
Mob-:9604993715