हुतात्मा नाग्या कातकरी

SV    03-Feb-2022
Total Views |
 
 
     आज आपण ज्या स्वतंत्र भारतात  श्वास घेतो आहोत, त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे,  मात्र स्वातंत्र्याच्या लढयात वनात राहणाऱ्या जनजातींचेही मोठे योगदान होते, ते आपल्याला विसरता कामा नये. १८५७ पासून ते स्वातंत्र्याच्या लढाईपर्यंत त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुतीही दिली आहे. जनजातींनीही गुलामगिरीविरुध्द लढा काय असतो हे आपल्या बलिदानातून वेळोवेळी  दाखवून दिले आहे,

   जुलमी इंग्रज सरकारच्या कार्यकाळात  जनजाती समाजातील शूरवीर, पराक्रमी, लढवय्ये राजे आपापली राज्ये अथक प्रयासाने पण शर्थीने सांभाळत होते. इंग्रजांचे वर्चस्व झुगारून ते  मोठ्या प्रमाणावर संघर्ष करीत होते.  याच काळात हुतात्मा नाग्या कातकरी याचे नाव विशेष गाजले.  उरण जवळच्या चिरनेर गावी झालेल्या जंगल सत्याग्रहात नाग्या कातकरीचे हौतात्म्य ऐतिहासिक ठरले होते.  

इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान जनजातींचा जंगलावरील हक्क नाकारला होता. जंगलातून लाकूड, गवत गोळा  करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लादले. गाई - म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. त्यातीलच एक आंदोलन म्हणजे चिरनेर मधील अक्काबाईच्या जंगलातील आंदोलन.   खैराच्या झाडापासून कात काढणारे आम्ही कातकरी असलो तरीही  आम्ही कातकरी जंगलाचे राजे आहोत, श्रीरामाच्या वानरसेनेचे वंशज आहोत, असे कातकरी अभिमानाने सांगत. त्या काळात गरीब जनजातीचे सऱ्हास शोषण होत असे. जंगलाचे मक्तेदार त्यांना लुबाडत होते. गांधींजींच्या सविनय सत्याग्रहाने  चिरनेर जंगल सत्याग्रहासाठी जनजातीने जागरण केले. त्यांचा म्होरक्या नाग्या कातकरी झाला. नाग्याचे जंगलाशी अगदी लहानपणापासून जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. ही जंगलसंपत्ती  सरकारी कायद्याने आणि जंगल मक्तेदारांच्या अरेरावीने कातकऱ्यांच्या वाट्याला येत नव्हती. कातकरी समाजाला या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कातकरी टोळ्या गोळा केल्या गेल्या.  त्यांची एक संघटना तयार केली गेली. त्यांचे नेतृत्व या कोवळ्या वयातील विशीतील नाग्याकडे होते. त्याने सत्याग्रहात उडी घेतली. चिरनेरच्या जंगलात कोयते, कुऱ्हाडी घेऊन  कातकरी त्या सत्याग्रहात सहभागी झाले. या सत्याग्रहात पाच हजार जनजाती  समाज गोळा झाला होता. जंगलापासून दूर राहणं या जाणिवेने  सत्याग्रहात  उतरलेल्यांचे बळ अधिक वाढले होते. कारण जंगलाशिवाय राहणे, हा विचारच ते करू शकत नव्हते.  नाग्याच्या विशेष शेलकीत  त्याने डोंगरावरच्या सर्वात उंच झाडाच्या शेंड्यावर झेंडा बांधला होता. नाग्याच्या पराक्रमाची  जणू पताकाच तो झेंडा फडकावीत होता. तेव्हापासून उंच झाडाला झेंडा बांधूनच  कातकरी संघर्षाला तोंड देत असत. त्याठिकाणी अक्काबाईचे जंगल होते. त्या अक्काबाईच्या जंगलात पोलिसांचा स्वैर गोळीबार झाला. लोक सैरभैर झाले, पांगले. त्या गर्दीत नाग्याच्या मांडीत आरपार गोळी घुसली. नाग्याला शेवटी झोळीत घालून त्याच्या वडिलांनी कातकरी वाडीत नेले. जखमी कातकरी नाग्या शेवटी एकाकी झाला. त्याला रुग्णालयाचे उपचार मिळाले नाहीत. तो केवळ घरगुती उपचारावर होता. गावठी औषधांवर राहून तो आपल्या जखमेवरचा घाव भरत होता. ठकी नावाची  त्याची  बहीण त्याची देखभाल करत होती. पण १९१० साली जन्मलेला नाग्या ऐन तारुण्यात चिरनेरच्या सत्याग्रहात हुतात्मा झाला.