भारतात सरकारी जणगणनेनुसार मुस्लिम १५% आहेत. परंतु मुस्लिम समाज देशात आपण २२% आहेत असे मानतो. याचा अर्थ देशात मुस्लिम अल्पसंख्यक आहेत. असे असले तरी जगातील सर्व देशात सर्वात जास्त मुस्लिम जनसंख्या भारतातच आहे. तरीसुद्धा भारतात मुस्लिम समाजाचा दर्जा पदावरून काढून टाकलेल्या मनसबदाराचाच आहे. त्यांच्या हजारो अलिशान मशिदी आहेत. जगात नाव असलेले मदरसे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक, धार्मिक संस्था असून सुद्धा समाज बेकिंमत आहे. सत्ताधारी पक्ष जाहीरपणे मुस्लिमांची निर्भत्सना करतो. विरोधी पक्ष सुद्धा फार किंमत देत नाहीत. २८ विरोधी पक्षांचे गटबंधन झाले आहे त्यात काश्मीरमधील मुस्लिम पक्ष आणि केरळ मध्ये असलेला मुस्लिम लीग पक्ष सोडला तर अन्य कोणत्याही मुस्लिम पक्षाला प्रवेशसुद्धा नाही. खरेतर लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला सर्व क्षेत्रात वाटा मिळायला पाहिजे. पण आमच्यात कोणतीही गुणवत्ता नसल्यामुळे आम्हाला शून्य किंमत आहे.
ज्या वृक्षांचा लोकांना उपयोग असतो असे वृक्षच आपली मुळे खोलवर नेऊन वादळांना टक्कर देऊनसुद्धा ठाम उभे असतात. आमचे मुस्लिम बांधव आपल्या मुस्लिम बांधवाचे दुःख दूर करणे, त्याच्या अडचणीत मदत करणे हे सहसा करत नाहीत. ते याला धर्माचे काम समजत नाहीत. त्या ऐवजी ते मशिदीत १ महिना वैराग्य (एअतिकाफ) धारण करणे पसंत करतात. ते त्यांना जास्त पुण्याचे काम वाटते.
मुस्लिम समाज सर्व आघाड्यांवर समस्याग्रस्त आहे. परंतु प्रत्येक मशिदीत तासबीह (जपमाळ) घेतलेले मुस्लिम बसले आहेत. त्यांचा मुस्लिमांच्या अडचणी सोडवणे, गरिबी दूर करण्यात कोठेही सहभाग नाही.
देशाची प्रगती, देशाचा विकास यात आपली भूमिका काय? जगात मानवतेचे काम करण्यासाठी इस्लाम अवतरला असे सांगितले जाते. त्यासाठी अल्लाने मुस्लिम समाजाला कुराण दिले; यावर मुस्लिम समाजाचा पूर्ण विश्वास आहे. असा समाज आज बेशुद्ध का? बेकारी, उपासमार, व्यसनाधीनता याला ते अल्लाची इच्छा असे कसे समजतात? 'करावे तसे भरावे' हा अल्लाचा नियम आहे. बहुसंख्य मुस्लिम समाज नेहमी सरकारी संस्थांकडे हात पसरून उभा आहे. सर्व गोष्टी फुकट मिळवण्यासाठी धडपडत आहे. खोटे बोलून फुकट मिळवण्यासाठी समाजातील धनवानसुद्धा उत्पन्न कमी दाखवून आयुष्मान कार्ड मिळवून फुकट आरोग्य सेवा मिळवत आहेत.
विचार करा, आम्ही देशाला काय दिले? ज्या इमारतींचे आम्ही कौतुक करतो त्या शतकांपूर्वी आमच्या पूर्वजांनी बांधल्या. आम्ही त्यासाठी काहीही केलेले नाही. खरे तर यावरसुद्धा विचार केला पाहिजे. ताजमहालाच्या ऐवजी आमच्या पूर्वजांनी एखादी संशोधन संस्था का उभी केली नाही? त्यामुळेसुद्धा शहाजहानचे नाव अजरामर झाले असते. कलेच्या जपणूकीपेक्षा इस्लामचा प्रसार (तबलीगी) का केला नाही. कुतुबमिनार ऐवजी युनिव्हर्सिटी का काढली नाही? असे केले असते तर आज देशात इस्लाम दुष्मन नाही? असे केले असते तर आज देशात इस्लाम दुष्मन राहिले नसते. सर्व मुस्लिम समाज सुशिक्षित झाला असता. या अलिशान इमारतींमुळे त्याच्या निर्मात्यांना आणि समाजाला काहीही फायदा झाला नाही इमारती आपल्या जागेवर आणि समाजही 'जैसे थे' राहिला!
आज आमचा तरुण वर्ग नशेखोरीत बरबटला आहे. कोणत्याही दवाखान्यात ८०% रुग्ण मुस्लिम आहेत. आम्ही देशाला रोगराई देणारे झालो आहोत. आम्ही समाजाला फसवणारे व्यापारी, कामचुकार कामगार, चोऱ्या करणारे मजूर दिले. कोणीही मुस्लिम, मुस्लिम व्यापाऱ्याकडून काहीही खरेदी करत नाही, मुस्लिम नोकर कामाला ठेवत नाही. आम्ही श्रद्धापूर्वक कुराणाचा पाठ (तिलावत ) करतो. पण आपल्या देशाला आणि समाजाला अडाणी ठेवले. आज ८०% मुस्लिम समाज अडाणी आहे. त्यामुळे मुस्लिम समाज एक समस्या बनला आहे.
समाजाच्या अनेक संस्था आणि नेते समाजाच्या प्रश्नांची चर्चा करतात. बहुतेक सर्वजण धार्मिक समस्यांचीच चर्चा करतात. मशिदी, मदरसे, निकाह आणि तलाक हेच चर्चेचे विषय असतात. आमच्या धार्मिक नेत्यांचा कार्यक्रम राअबान (८ वा महिना) मध्ये दस्तारबंदी (कुराण पाठ केलेल्यांना पगडी बांधणे) यात सुद्धा खोटेपणा असतो. ज्या मुलांनी पूर्वीच कुराण पाठ केले (हाफिज) त्यांनाच पुन्हा पुन्हा पगडी बांधली जाते. केवळ हाफीजची संख्या वाढवण्यासाठी असे केले जाते. रमजानमध्ये जकात वसुली, शव्वाल (१० वा महिना) महिन्यात बेवारस मुलांचा शोध, बकरी ईदच्या काळात फुकट मिळणाऱ्या बकऱ्यांची वाट पहाणे, खीउल अव्वल (तिसरा महिना) महिन्यात जुलूस महमदी, आणि सीरत (महंमदाचे चरित्र) कॉन्फरन्स, वेळ मिळाला तर धर्म भ्रष्टांच्या विरुद्ध कॉन्फरन्स, धार्मिक आणि सामाजिक संस्था एखादे पुस्तक प्रकाशित करतात. त्यासाठी आपल्याच लोकांना बोलावतात. त्यात लेखकाला प्रशस्तीपत्रक, बक्षीस देतात. साधारणपणे लेखकाने संस्थेला मोठी देणगी दिलेली असते. वर्षाकाठी एक दोन सेमिनार ज्यात स्टेजवर बसलेल्या मान्यवरांची संख्या श्रोत्यांपेक्षा जास्त असते, त्यात वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला जातो.
आजच्या आमच्या नव्या पिढीला शाहरुख खान, अमीर खान, सलमान खान रोल मॉडेल आहेत. इब्त सीना, इमाम राजी, इमाम गजाली यांची नावेसुद्धा त्यांना माहित नाहीत. देशाची कोणतीही समस्या आमच्या अजेंड्यावर नाही. आम्ही जर देशाची चिंता करत नाही, देशाच्या प्रगतीत वाटा उचलत नाही; तर, आम्हाला देशाच्या उत्पन्नात, संपत्तीत वाटा का मिळेल? देशाची संपत्ती हा आमच्या बापाचा माल नाही, की जी आपोआप मिळेल. देशाच्या समस्येवर आम्ही कधीही आंदोलन केले नाही, कधी धरणे धरले नाही. आमच्या नेत्यांनी यासाठी कधी राजीनामा दिला नाही. व्यक्तिगत समस्या बाजूला ठेऊन समाजाच्या समस्या आपल्या मानणाऱ्यांना समाज नेतृत्व बहाल करतो.
माझ्या मित्रानों ! आम्ही समाजात आमची उपयुक्तता सिद्ध केली पाहिजे. आम्ही समाजाला 'देणारे' बनले पाहिजे. आमच्या शिक्षकांनी रिकाम्या वेळात विद्यार्थ्यांना मोफत शिकवावे. आमच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन धर्मार्थी रुग्णालय चालवावे. रुग्णाला लुटण्यासाठी ही रुग्णालये नकोत. आमच्या तरुणांनी संशोधन कार्यात आपले जीवन झोकून द्यावे. आमच्या हातांनी दुबळ्यांना आधार दिला पाहिजे. संपत्ती सत्कारणी दान केली पाहिजे. मजुरांनी प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत, अंगचोरपणा नको. असे केले तर अल्ला निश्चितपणे यश देईल. असे केले नाही तर याहून वाईट दिवस येतील. वाट पहात रहा.
अब्दुल गफार सिद्दिकी,
मुं. उर्दू न्यूज २१.९.२३